भारतीय पुरुष, महिला हॉकी संघ रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 04:28 AM2019-08-12T04:28:27+5:302019-08-12T04:28:36+5:30
टोकियो येथे १७ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या आॅलिम्पिक टेस्ट स्पर्धेसाठी भारताचा पुरुष आणि महिला हॉकी संघ रवाना झाला आहे.
बंगळुरू : टोकियो येथे १७ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या आॅलिम्पिक टेस्ट स्पर्धेसाठी भारताचा पुरुष आणि महिला हॉकी संघ रवाना झाला आहे.
भारताच्या पुरुष आणि महिला संघांना याच वर्षी आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेतही सहभागी व्हायचे आहे. नोव्हेंबर महिन्यात होणाºया क्वालिफायरआधी दोन्ही संघांना आॅलिम्पिक टेस्ट स्पर्धेत चांगला अनुभव मिळण्याची आशा आहे. भारताचा पुरुष संघ यजमान जपान, न्यूझीलंड आणि मलेशियाविरुद्ध खेळेल तर महिला संघाला आॅस्ट्रेलिया, चीन आणि जपानचा सामना करावा लागेल. ही स्पर्धा युवा खेळाडूंना त्यांचा ठसा उमटवण्यासाठी चांगली संधी असेल. त्याचप्रमाणे टोकियोत आॅलिम्पिक होणार असल्यामुळे तेथील परिस्थिती समजण्याची संधी मिळणार असल्याचे भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीतसिंग म्हणाला. डिफेंडर ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत म्हणाला, ‘‘आम्ही आॅलिम्पिक क्लालिफिकेशन विषयी सकारात्मक आहोत. या ठिकाणी खेळल्याने आम्हाला तेथील परिस्थिती समजण्यास मदत होईल आणि आम्ही स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहोत.’’ महिला संघाची कर्णधार राणी म्हणाली, ‘‘गेल्या एका वर्षात आम्ही जपान आणि चीनविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे; परंतु एक संघ आहे की, ज्याच्याविरुद्ध आम्ही चांगली कामगिरी करू इच्छितो तो संघ आॅस्ट्रेलिया आहे.’’