भारतीय पुरुष हॉकी संघाला ऑलिम्पिक टेस्ट स्पर्धेचे जेतेपद; लक्ष्य टोकियो 2020
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 11:55 AM2019-08-21T11:55:01+5:302019-08-21T11:55:22+5:30
भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक टेस्ट स्पर्धेत बुधवारी न्यूझीलंडला 5-0 असे पराभूत करून जेतेपदाची माळ गळ्यात घातली.
भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक टेस्ट स्पर्धेत बुधवारी न्यूझीलंडला 5-0 असे पराभूत करून जेतेपदाची माळ गळ्यात घातली. या विजयासह भारतीय संघाने राऊंड रॉबीनमध्ये झालेल्या पराभवाची सव्याज परतफेड केली. कर्णधार हरमनप्रीत सिंग ( 7 मिनिट), शमशेर सिंग (18 मि.), निलकांता शर्मा ( 22 मि.), गुरसाहीबजीत सिंग ( 26 मि.) आणि मनदीप सिंग ( 27 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. राऊंड रॉबीनमध्ये न्यूझीलंडने 2-1 अशा फरकाने भारताला पराभूत केले होते.
''आम्ही दमदार खेळ केला. सामन्यात मिळालेल्या संधीवर गोल करण्यात आम्ही यशस्वी ठरलो,''असे मत हरमनप्रीतने व्यक्त केले. तो म्हणाला,''अंतिम सामना हा आव्हानात्मकच असतो. राऊंड रॉबीनमध्ये आम्ही न्यूझीलंडकडून हरलो होतो. मात्र, त्या सामन्यातील चुकांवर आम्ही भरपूर मेहनत घेतली आणि त्याचे फळ मिळाले.''
दोन्ही संघांना मैदानाच्या मध्यरेषेवरच अधिक खेळ करण्यावर भर दिला. भारताने सातव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला, परंतु त्यावर गोल करण्यात अपयशी ठरले. मात्र, कर्णधार हरमनप्रीतने पुन्हा मिळालेल्या कॉर्नरवर गोल करताना भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारताने सामन्यावरील पकड मजबूत केली. न्यूझीलंडकडून पलटवार झाला, परंतु भारताची बचावफळीही तितकीच तगडी होती.
Make way for the WINNERS!! 🇮🇳🥇
— Hockey India (@TheHockeyIndia) August 21, 2019
FIH Series Finals: ✔
Olympic Test Event: ✔
Next 🆙: Olympic Qualifier #IndiaKaGame#ReadySteadyTokyo#Tokyo2020@WeAreTeamIndiapic.twitter.com/FFToOT0ijj
शमशेरने 18व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करताना भारताची आघाडी 2-0ने मजबूत केली. दुसऱ्या सत्रात किवींच्या खेळाडूंना केवळ दोनदाच भारताच्या वर्तुळात प्रवेश करता आला. याच दरम्यान भारताने तीनवेळा किवींच्या वर्तुळात आगेकूच केली. 22व्या मिनिटाला गुरसाहीबजीत आणि मनदीपच्या पासवर निलकांताने गोल केला.
India wins Men’s Gold Medal match vs NZL (5-0). IND captain Harmanpreet Singh: “We played very well! We managed to score our opportunities at the start of the game.”#ReadySteadyTokyo#Tokyo2020@Olympics@Tokyo2020@TheHockeyIndiapic.twitter.com/wayQb8Nq9F
— International Hockey Federation (@FIH_Hockey) August 21, 2019
त्यानंतर गुरसाहीबजीत आणि मनदीप यांनी पेनल्टी कॉर्नरवर गोल करताना भारताला 5-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. या विजयानंतर भारताचे लक्ष्य टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रता फेरीकडे लागले आहे. 25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत पात्रता स्पर्धा होणार आहे.