भारतीय महिलांचा दणदणीत विजय, मलेशियाला ४-१ ने लोळवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 02:14 AM2018-04-07T02:14:26+5:302018-04-07T02:14:26+5:30
अखेरच्या पाच मिनिटात दोन गोल नोंदविणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाने अ गटात शुक्रवारी मलेशियाचा ४-१ ने पराभव करीत राष्ट्रकुल स्पर्धेत विजयी पथावर मार्गक्रमण केले.
गोल्ड कोस्ट - अखेरच्या पाच मिनिटात दोन गोल नोंदविणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाने अ गटात शुक्रवारी मलेशियाचा ४-१ ने पराभव करीत राष्ट्रकुल स्पर्धेत विजयी पथावर मार्गक्रमण केले.
गुरजित कौरने ६ व्या तसेच ३९ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदविले. कर्णधार राणी रामपालने ५६ व्या तसेच लालरेमसियामीने ५९ व्या मिनिटाला एकेक गोल केला. याआधी काल वेल्सकडून भारतीय संघ ३-२ ने पराभूत झाला होता. मलेशियाकडून एकमेव गोल नुरेनी राशीद हिने पेनल्टी कॉर्नरवर नोंदविला.
विजयानंतर राणी म्हणाली,‘हा चांगला निकाल आहे. आम्ही उत्तरार्धात चमकदार खेळ केला. मलेशियाच्या खेळाडूंनी पहिल्या आणि दुसºया क्वॉर्टरमध्ये संधीच दिली नाही. कालचा दिवस खराब होात. अनेकदा पराभूत होऊनही खेळात मुसंडी मारणे शक्य होते. आजच्या लढतीत आमची बचावफळी तगडी होती.’ दोनवेळा राष्टÑकुल विजेता राहिलेला भारतीय संघ आता रविवारी इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. ग्लास्गो राष्ट्रकुलमध्ये भारताला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. (वृत्तसंस्था)
भारतीय बॅडमिंटन संघाची घोडदौड
भारतीय बॅडमिंटन खेळाडूंनी सातत्यपूर्ण कामगिरी करताना सलग तिसरा क्लीन स्वीप नोंदवताना स्कॉटलंडचा ५-० असा धुव्वा उडवला. या शानदार कामगिरीसह भारतीय संघाने राष्ट्रकुल स्पर्धेच्या मिश्र सांघिक गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
स्टार खेळाडू सायना नेहवालने महिला एकेरीत ज्यूली मैकफरसनचा २१-१४, २१-१२ असा सहज पराभव करत भारताला आघाडीवर नेले. यानंतर पुरुष जागतिक क्रमवारीत दुसºया स्थानी असलेल्या किदाम्बी श्रीकांतने आपला हिसका दाखवताना कीरन मेरीलीस याचा २१-१८, २१-२ असा फडशा पाडला. यासह भारताने २-० अशी भक्कम पकड मिळवली.
एन. सिक्की रेड्डी - अश्विनी पोनप्पा या जोडीने के. गिलमौर - एलिनोर ओडोनेल यांचा २१-८, २१-१२ असा पराभव करत भारताला ३-० अशी विजयी आघाडी मिळवून दिली. यानंतर औपचारिकता राहिलेल्या पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी - चिराग शेट्टी यांनी पॅट्रिक मैकचुग - अॅडम हाल यांना २१-१६, २१-१९ असे नमविले. अखेरच्या सामन्यात प्रणव चोप्रा - सिक्की रेड्डी यांनी मिश्र गटात मार्टिन कॅम्पबेल - ज्यूली मॅकफरसन यांचा २१-१७, २१-१५ असा पराभव करुन भारताच्या शानदार विजयावर शिक्कामोर्तब केले.
आॅस्ट्रेलियन जलतरणपटूंचा धडाका
युवा काइल चाल्मर्स याच्या नेतृत्वामध्ये यजमान आॅस्टेÑलियाने जलतरण स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करताना तब्बल ५ सुवर्ण पटकावत एक रौप्य पदकही जिंकले. आॅलिम्पिक चॅम्पियन चाल्मर्स याने २०० मी. फ्रीस्टाइलमध्ये ४५.५६ सेकंदाची सर्वोत्तम वैयक्तिक वेळ नोंदवत सुवर्ण पटकावले. यानंतर त्याने ४ बाय १०० मीटर सांघिक गटातही सुवर्ण जिंकले. ‘स्प्रिंट क्वीन’ केट कॅम्पबेल हिने आपला दबदबा राखताना आॅसीला ४ बाय १०० मी. फ्रि स्टाइलचे सुवर्ण जिंकवून दिले. आॅसी महिलांनी यावेळी २३.८८ सेकंदाची विश्वविक्रमी वेळ नोंदवत वर्चस्व राखले. मिच लार्किन, क्लाइड लुईस व एम्मा मॅकियोन यांनीही आॅस्टेÑलियासाठी सुवर्ण जिंकले.