भारतीय महिला हॉकी संघ अंतिम फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:20 AM2018-05-18T00:20:20+5:302018-05-18T00:20:20+5:30
गतविजेत्या भारतीय महिला हॉकी संघाने गुरुवारी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत सलग तिसऱ्या विजयासह अंतिम फेरीत धडक दिली.
डोंघायसिटी (द. कोरिया) : गतविजेत्या भारतीय महिला हॉकी संघाने गुरुवारी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत सलग तिसऱ्या विजयासह अंतिम फेरीत धडक दिली. भारताने मलेशियाचा ३-२ ने पराभव केला. याआधी जपानला ४-१ आणि बलाढ्य चीनला ३-१ ने पराभूत केले होते. नऊ गुणांसह भारतीय महिला पहिल्या स्थानावर असून अंतिम फेरीत भारतीय महिलांची यजमान कोरियाच्या संघाशी गाठ पडणार आहे.
गुरजित कौर (१७ वा मिनीट), वंदना कटारिया (३३ वा मिनीट) आणि लारेमिसामी (४० वा मिनीट) यांनी भारताकडून गोल निर्णायक झळकावले. मलेशियाकडून नुरानी राशिद आणि हनिस ओनने गोल केले. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले.
मात्र दुसºया क्वार्टरमध्ये भारताने दमदार खेळ करत आघाडी घेत मलेशिया संघावर दडपण आणले. यानंतर मलेशियाच्या खेळाडूंनी मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय महिलांच्या भक्कम बचावापुढे त्यांची डाळ शिजू शकली नाही. अखेर भारतीयांनी आघाडी कायम राखत बाजी मारली. (वृत्तसंस्था)
>आम्ही गोल नोंदविण्याच्या अनेक संधी गमावल्या. या विजयावर मात्र आनंदी आहोत. झालेल्या चुकांवर तोडगा काढून पुढील सामन्यात उतरणार आहोत.
- सुनीता लाक्रा,
कर्णधार भारतीय हॉकी संघ