भारतीय महिला हॉकी संघ विजयी, बेल्जियमच्या ज्युनिअर पुरुष संघाला केले पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 03:59 AM2017-09-20T03:59:20+5:302017-09-20T03:59:22+5:30
भारतीय महिला हॉकी संघाने आपल्या युरोप दौ-याचा समोराप विजयाने केला. मात्र, या वेळी त्यांनी बेल्जियमच्या ज्युनियर पुरुष संघाला ४-३ असे पराभूत केले.
एंटवर्प (बेल्जियम) : भारतीय महिला हॉकी संघाने आपल्या युरोप दौ-याचा समोराप विजयाने केला. मात्र, या वेळी त्यांनी बेल्जियमच्या ज्युनियर पुरुष संघाला ४-३ असे पराभूत केले.
भारताकडून गुरजित कौर व कर्णधार राणी यांनी प्रत्येकी दोन गोल केले. भारताने सामन्याच्या सातव्या मिनिटालाच मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले. गुरजितने हा गोल करीत १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर ११ व्या मिनिटाला गुरजितनेच पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करीत २-० अशी आघाडी वाढविली.
त्यानंतर कर्णधार राणीने १३ व्या मिनिटाला गोल करीत भारताला ३-० अशी मजबूत आघाडी मिळवून दिली. भारताची गोलरक्षक रजनी एटिमार्पूने आपले कौशल्य पणाला लावत अनेक गोल परतवून लावले. मध्यंतरापर्यंत भारताकडे ३-० अशी आघाडी होती.
मध्यंतरानंतरही भारताचा गोल करण्याचा धडाका कायम होता. सामन्याच्या ३३ व्या मिनिटाला राणीने आणखी एक गोल करीत ४-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर मात्र बेल्जियमने आपला खेळ उंचावला. थिबाल्ट नेवेन याने ३८ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले. त्यानंतर विल्यम डेसेलने गोल करीत आघाडी २-४ अशी कमी केली.
सामन्याच्या ४८ व्या मिनिटाला माथियास रेलिकने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करीत ३-४ अशा स्थितीत सामना आणला. शेवटच्या दहा मिनिटांत बेल्जियमने सामना बरोबरीत आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र, यात त्यांना यश आले नाही. (वृत्तसंस्था)