भारतीय महिलांचा मालिका विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 05:14 AM2019-04-12T05:14:43+5:302019-04-12T05:14:48+5:30
क्वाललांपूर : मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने यजमान मलेशियाचा १-० असा पराभव करत पाच सामन्यांची मालिका ४-० ...
क्वाललांपूर : मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने यजमान मलेशियाचा १-० असा पराभव करत पाच सामन्यांची मालिका ४-० अशी जिंकली. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकल्यानंतर भारताला तिसऱ्या सामन्यात बरोबरी मान्य करावी लागली. यानंतर तिसरा सामना जिंकून विजयी आघाडी घेतल्यानंतर भारतीय महिलांनी अखेरच्या सामन्यातही बाजी मारुन मालिका विजयावर शिक्का मारला.
नवज्योत कौर हिने ३५व्या मिनिटाला केलेला निर्णायक गोल सामन्यातील एकमेव गोल ठरला. या गोलच्या जोरावर मिळवलेली आघाडी भारताने अखेरपर्यंत टिकवताना शानदार विजय मिळवला. यानंतर भारतीयांनी मलेशियाच्या गोलक्षेत्रात अनेक हल्ले केले, मात्र गोल करण्यात त्यांना यश आले नाही.
या विजयानंतर संघाचे प्रशिक्षक
शोर्ड मरिन यांनी सांगितले की, ‘आम्हाला खेळात अजूनही सुधारणा करावी लागेल. सामन्यात गोल करण्यासाठी मिळालेल्या संधी साधाव्या लागतील. आमचा संघ आक्रमक चाली रचण्यात आणि पेनल्टी कॉर्नर मिळविण्यात यशस्वी ठरला याचा आनंद आहे. मात्र या संधीवर गोल करणेही महत्त्वाचे आहे.’ (वृत्तसंस्था)