भारतीय युवा हॉकी संघाची विजयी सलामी, जपानचे कडवे आव्हान ३-२ असे परतावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 04:02 AM2017-10-23T04:02:53+5:302017-10-23T04:03:08+5:30
चुरशीच्या झालेल्या सामन्यात दलप्रीत सिंगने केलेल्या शानदार दोन गोलच्या जोरावर भारताच्या ज्यूनिअर पुरुष हॉकी संघाने सातव्या सुलतान जोहोर चषक स्पर्धेत विजयी सलामी दिली.
जोहोर बहरु (मलेशिया) : चुरशीच्या झालेल्या सामन्यात दलप्रीत सिंगने केलेल्या शानदार दोन गोलच्या जोरावर भारताच्या ज्यूनिअर पुरुष हॉकी संघाने सातव्या सुलतान जोहोर चषक स्पर्धेत विजयी सलामी दिली. भारताने मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना जपानचे कडवे आव्हान ३-२ असे परतावले.
तमान दाया हॉकी स्टेडियममध्ये झालेल्या या रंगतदार सामन्यात भारताने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन केले. पहिल्या सत्रात वर्चस्व राखल्यानंतर भारताला जपानकडून कडवी टक्कर मिळाली.
११व्या मिनिटालाच दलप्रीतने गोल करत भारताला आघाडीवर नेले. हीच आघाडी पहिल्या क्वार्टरपर्यंत भारताने कायम राखली. यानंतर २३व्या मिनिटाला क्योहेई ओगावा याने गोल करुन जपानला १-१ अशी बरोबरी साधून दिली.
तिसºया क्वार्टर मध्ये दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ करताना आक्रमणाला प्रतिआक्रमणाने उत्तर दिले.
यावेळी ओगावाने पुन्हा एकदा भारतीय क्षेत्रात मुसंडी मारत ३१व्या मिनिटाला वेगवान गोल करताना जपानला आघाडीवर नेले. परंतु, ४१व्या मिनिटाला सुखजीत सिंगने महत्त्वपूर्ण गोल करुन भारताला २-२ असे बरोबरीवर आणल्यानंतर ५३व्या मिनिटाला दलप्रीतने सामन्यातील निर्णायक गोल करून भारताला ३-२ असे आघाडीवर नेले.
यानंतर, हीच आघाडी अखेरपर्यंत कायम राखताना भारताने जपानला पराभवाचा धक्का देत स्पर्धेला विजयी सुरुवात केली. (वृत्तसंस्था)