2023च्या वर्ल्ड कप आयोजनासाठी भारताची दावेदारी, जूनमध्ये होणार निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 02:43 PM2019-02-05T14:43:09+5:302019-02-05T14:46:31+5:30
भुवनेश्वर येथे 2018चा पुरुष हॉकी वर्ल्ड कप नुकताच पार पडला. स्पर्धेतील यशानंतर हॉकी इंडियाने आणखी एका स्पर्धेसाठी दावेदारी सांगितली आहे.
मुंबई : भुवनेश्वर येथे 2018चा पुरुष हॉकी वर्ल्ड कप नुकताच पार पडला. यामध्ये यजमान भारतीय संघाला उपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला असला तरी खेळाडूंच्या कामगिरीने चाहत्यांची मनं जिंकली. हॉकी वर्ल्ड कपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर हॉकी इंडियाने आणखी एका वर्ल्ड कप आयोजनासाठी कंबर कसली आहे. हॉकी इंडियाने 2023 च्या पुरुष किंवा महिला हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनाची तयारी दर्शवली आहे.
Six countries submit their bid to host the next Hockey World Cups!
— International Hockey Federation (@FIH_Hockey) February 5, 2019
The events to be played in 2022 & 2023!
Click on the link for more details 👇https://t.co/YhfqSjbNPv#HWC#WorldCuppic.twitter.com/xq6sJKTcHS
पुरुषांच्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी स्पेन, जर्मनी आणि मलेशिया, तर महिलांच्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया, जर्मनी व न्यूझीलंड यांनीही दावेदारी सांगितली आहे. जून 2019 मध्ये या स्पर्धेच्या आयोजकाबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी थिएरी वेल यांनी सांगितले की,'' या स्पर्धा आयोजनासाठी देशांनी दाखवलेल्या उत्सुकतेचा आम्हाला आनंद होत आहे. यावरून हॉकी वर्ल्ड कपची लोकप्रियता किती वाढली आहे, याचा अंदाज येतो. पुरुष व महिला वर्ल्ड कप स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी आम्ही उत्सुक आहोत.''