अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारताचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंगले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2018 09:23 PM2018-03-06T21:23:37+5:302018-03-06T21:23:37+5:30
या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारताला अर्जेंटीनाकडून 2-3 असा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडबरोबर 1-1 अशी बरोबरी केली होती.
नवी दिल्ली : भारताच्या अझलन शाह हॉकी स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. भारताला हॉकी स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात 2-4 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला आहे.
या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारताला अर्जेंटीनाकडून 2-3 असा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडबरोबर 1-1 अशी बरोबरी केली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताला 2-4 अशा मोठ्या फरकाने पराभूत व्हावे लागले. त्यामुळे तीन सामन्यांमध्ये भारताला फक्त एका गुणावर समाधान मानावे लागले आहे.
या सामन्याच्या मध्यंतरार्यंत भारतीय संघ 0-1 अशा पिछाडीवर होता. त्यानंतर तिसऱ्या सत्रामध्ये ऑस्ट्रेलियाने तीन गोल करत आपली आघाडी भक्कम केली. रमणदीप सिंगच्या मदतीच्या जोरावर भारताने पहिला गोल केला. त्यानंतर रमणदीपने दुसरा गोल केल्यामुळे भारताच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण भारतीय संघातील अन्य खेळाडूंना अपेक्षित कामगिरी करता आली नाही आणि भारताला पराभव स्वीकारावा लागला.