भारताची आज जपानविरुद्ध लढत, विजयी लय कायम राखण्याचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 02:14 AM2018-01-27T02:14:36+5:302018-01-27T02:14:48+5:30
अंतिम सामन्यात स्थान निश्चित करणारा भारतीय हॉकी संघ आज शनिवारी चार देशांच्या आमंत्रित हॉकी स्पर्धेत अखेरच्या साखळी लढतीत जपानविरुद्ध खेळणार आहे
हॅमिल्टन : अंतिम सामन्यात स्थान निश्चित करणारा भारतीय हॉकी संघ आज शनिवारी चार देशांच्या आमंत्रित हॉकी स्पर्धेत अखेरच्या साखळी लढतीत जपानविरुद्ध खेळणार आहे. भारताने यजमान न्यूझीलंडवर ३-२ ने आणि विश्व रँकिंगमध्ये तिसºया स्थानी असलेल्या बेल्जियमवर ५-४ असा विजय नोंदविल्याने संघाचा आत्मविश्वास बळावला.
तौरंगा येथे पहिल्या टप्प्यात जपानवर ६-० असा विजय नोंदविल्यानंतर भारतीय संघ आज गालाघर हॉकी स्टेडियमवर पुन्हा एकदा विजय नोंदविण्यास सज्ज झाला आहे. भारत सलग तिसºया विजयाच्या प्रयत्नांत असणार. पण मुख्य कोच मारिन शोर्ड यांना खेळाडूंनी आपल्या उणिवा दूर सारण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा आहे. हॉलंडचे ३४ वर्षीय मारिन म्हणाले, ‘आम्ही चेंडूवर अधिक काळ नियंत्रण कसे राखायचे, हे तंत्र सुधारू. जपान विरुद्धच्या सामन्यात हे काम करू शकतो. बेल्जियमविरुद्ध डावपेच यशस्वी ठरले. गोल नोंदविण्यात आम्ही यशस्वी होऊ शकलो.’
भारतीय संघ स्पर्धेत सहा गुणांसह आघाडीवर आहे. न्यूझीलंड दुसºया तसेच बेल्जियम तिसºया स्थानी आहे. अंतिम सामन्यात कुणाविरुद्ध खेळावे लागेल, हे न्यूझीलंडविरुद्ध बेल्जियम यांच्यातील निकालानंतर स्पष्ट होईल