भारताचा बलाढ्य बेल्जियमला धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 04:25 AM2020-02-09T04:25:01+5:302020-02-09T04:25:07+5:30
प्रो लीग हॉकी । पहिल्या सामन्यात २-१ ने विजय
भुवनेश्वर : भारताच्या पुरुष हॉकी संघाने शनिवारी एफआयएच प्रो लीग हॉकीच्या पहिल्या सामन्यात जग्गजेत्या बेल्जियमला २-१ ने पराभवाचा धक्का दिला. भारताने पहिल्या फेरीत नेदरलँडला पराभूत केले होते.
भुवनेश्वर येथील कलिंगा हॉकी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने धडाकेबाज खेळ केला. बेल्जियमचा संघ गुणतालिकेत ११ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. या लीगमध्ये बेल्जियम अपराजित होता. मात्र भारतात पहिल्याच सामन्यात बेल्जियमला धक्का बसलेला आहे.
भारतीय खेळाडूंनी पहिल्या सत्रापासूनच आक्रमक खेळावर भर दिला. भारतीय आघाडीपटूंनी बेल्जियमच्या बचावपटूंवर दबाव आणला. मनदीपसिंग याने सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवून आघाडी मिळवून दिली. बेल्जियमने सामन्यात पुनरागमन करण्याचे प्रयत्न केले. मात्र, मध्यांतरापर्यंत भारताने आपली १-० अशी आघाडी टिकवून ठेवली. भारताचा गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने बेल्जियमच्या आघाडीच्या खेळाडूंच्या चाली हाणून पाडल्या.
सामन्याच्या ३३ व्या मिनिटाला गौतियर बोकार्ड याने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवून बेल्जियमला १-१ अशी बरोबरी साधून दिली. तथापि, रमनदीपसिंग याने ४७ व्या मिनिटाला नोंदविलेला गोल सामन्यात निर्णायक ठरला. रमनदीपने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदविला.
जागतिक हॉकी क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाने स्थानिक चाहत्यांपुढे कलिंगा स्टेडियमवर अव्वल स्थानावरील बेल्जियमला धूळ चारताच आनंदाला उधाण आले होते. उभय संघांदरम्यान आज, रविवारी दुसरा सामना खेळला जाणार आहे. (वृत्तसंस्था)