राष्ट्रकुल हॉकीत भारत-पाक सलामी लढत, आशियाई चॅम्पियन भारताचा ‘ब’ गटात समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 01:50 AM2017-11-29T01:50:44+5:302017-11-29T01:50:56+5:30
मागील रौप्यपदकविजेता आणि आशियाई चॅम्पियन भारतीय पुरुष हॉकी संघ २०१८च्या गोल्ड कोस्ट राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत सलामीचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.
गोल्ड कोस्ट : मागील रौप्यपदकविजेता आणि आशियाई चॅम्पियन भारतीय पुरुष हॉकी संघ २०१८च्या गोल्ड कोस्ट राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत सलामीचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने मंगळवारी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार ब गटात भारतासोबत पाकिस्तान, मागच्या वेळेचा कांस्यविजेता इंग्लंड, मलेशिया तसेच वेल्स यांचा समावेश आहे. पाच वेळेचा चॅम्पियन यजमान आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड, द. आफ्रिका, कॅनडा आणि स्कॉटलंड हे संघ अ गटात आहेत. ५ ते १४ एप्रिल या कालावधीत स्पर्धेचे आयोजन होईल.
भारताला ७ एप्रिल रोजी पाकिस्तानविरुद्ध, ८ एप्रिलला वेल्सविरुद्ध, १० एप्रिलला मलेशियाविरुद्ध आणि ११
एप्रिल रोजी इंग्लंडविरुद्ध खेळायचे आहे.
भारताच्या महिला संघाला अ गटात इंग्लंड, द. आफ्रिका,
मलेशिया आणि वेल्ससोबत स्थान मिळाले असून ब गटात चॅम्पियन आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड, स्कॉटलंड, कॅनडा आणि घाना या संघांचा समावेश आहे. भारताच्या महिला संघाला ५ एप्रिलला वेल्स, ६ एप्रिलला मलेशिया, ८ एप्रिलला इंग्लंड आणि १० एप्रिलला द. आफ्रिकेविरुद्ध साखळी सामने खेळावे लागतील.
पुरुष गटात आॅस्ट्रेलिया पाच वेळा राष्टÑकुलविजेता असून भारताने दोनदा रौप्यपदक जिंकले. महिला गटात
यजमान असलेल्या चॅम्पियन आॅस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ होईल. प्रत्येक
गटातील अव्वल दोन संघ उपांत्य सामने खेळतील, तर अन्य संघ क्लासिफिकेशन सामने खेळतील. उपांत्य सामने १२ आणि १३ एप्रिलला होतील. कांस्यपदकाचे सामने आणि दोन्ही अंतिम सामने १४ एप्रिल रोजी होणार आहेत.