मेजर ध्यानचंद यांच्यासाठी ‘भारतरत्न’ मागणे योग्य नाही, माजी प्रशिक्षक ए. के. बन्सल यांनी उपस्थित केला प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:56 AM2017-08-28T00:56:46+5:302017-08-28T00:56:52+5:30
मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून जोर धरत आहे.
नवी दिल्ली : मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून जोर धरत आहे. या मागणीबाबत भारतीय हॉकी संघाचे माजी प्रशिक्षक ए. के. बन्सल यांनी मात्र प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या मते, अशी मागणी केल्याने मेजर ध्यानचंद यांच्या गौरवास कमी करण्यासारखे होईल.
दिल्ली क्रीडा पत्रकार संघ (डीएसजेए) आणि भारतीय शारीरिक शिक्षण फाउंडेशन (पीईएफआय) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या ‘राष्ट्रीय क्रीडा दिवसाचे महत्त्व’ या विषयावर बन्सल बोलत होते. ते म्हणाले, मला हेच कळत नाही, आपण ध्यानचंद यांच्यासाठी भारतरत्न का मागतोय. अशी मागणी करीत आपण ध्यानचंद यांनी मिळवून दिलेल्या गौरवास कमी करत आहोत. त्यांची उंची ही या सन्मानापेक्षा मोठी आहे. आता जोपर्यंत हा सन्मान त्यांना मिळत नाही, तोपर्यंत अशी मागणी सुरूच राहणार. मलाही वाटते की, ध्यानचंद यांना भारतरत्न मिळावा. यामुळे पुरस्काराचा मान आणखी वाढेल.
आॅलिम्पियन मुष्टियोद्धा अखिल कुमारने यावेळी खेळ संस्कृतीला प्रोत्साहन देण्यावर जोर दिला. तो म्हणाला, की शाळेपासून याची सुरुवात करावी लागेल. आपल्या देशात आजही लोक खेळाप्रती जागरूक नाहीत. त्यांच्यात जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. खेळाडूंना मानसोपचारतज्ज्ञांची गरज आहे, असे मला वाटत नाही.