आशियाई महिला हॉकीत भारतासमोर जपानचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 04:22 AM2018-05-13T04:22:26+5:302018-05-13T04:22:26+5:30
माजी विजेत्या भारतीय महिला हॉकी संघाला आज, रविवारपासून सुरू होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स हॉकी चषक स्पर्धेत जपानच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
डोंघई सिटी (चीन) : माजी विजेत्या भारतीय महिला हॉकी संघाला आज, रविवारपासून सुरू होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स हॉकी चषक स्पर्धेत जपानच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
अनुभवी खेळाडू सुनीता लाकडाच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आज जागतिक क्रमवारीतील १२ व्या क्रमांकावर असलेल्या जपानशी दोन हात करणार आहे. जपानने यापूर्वीही भारतासमोर आव्हान उभे केले होते. जपानच्या अभेद्य बचावफळीसमोर भारताच्या आघाडीपटूंचे कौशल्य पणास लागणार आहे.
आशियाई चॅम्पियन्स चषक स्पर्धेत २०१३ मध्ये जपानने भारताला पराभूत करीत विजेतेपद पटकावले होते. २०१६ मध्ये भारताने पेनल्टी शूटआऊटवर चीनला पराभूत
करीत पहिल्यांदाच जेतेपद पटकावले होते. लीग सामन्यात जपानने
भारताला २-२ असे बरोबरीत
रोखले होते. तसेच मागील
वर्षी जागतिक हॉकी लीग स्पर्धेत जपानने भारताला २-० असे पराभूत केले होते.
भारतीय कर्णधार लाकडा म्हणाली, ‘जपानने नेहमीच आमच्यासमोर आव्हान उभे केले आहे. त्यांचा बचाव भेदण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.’ (वृत्तसंस्था)