फोनी वादळात ‘कलिंगा’चे किरकोळ नुकसान, भुवनेश्वरमध्येच होणार हॉकी सिरिज फायनल स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 04:27 AM2019-05-09T04:27:22+5:302019-05-09T04:28:12+5:30
भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडिअमचे चक्रीवादळ फोनीमध्ये किरकोळ नुकसान झाले आहे.
नवी दिल्ली : भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडिअमचे चक्रीवादळ फोनीमध्ये किरकोळ नुकसान झाले आहे. मात्र हॉकी इंडियाने बुधवारी सांगितले की, ‘या महिन्यात होणारी हॉकी सिरिज फायनल्सच्या यजमानपदावर या वादळाचा कोणताही फरक पडणार नाही. ६ ते १५ जूनपर्यंत होणारी ही स्पर्धा भुवनेश्वरहून लखनऊ किंवा रायपूरला हलवण्यात येण्याची शक्यता हॉकी इंडियाच्या अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली आहे.
हॉकी इंडियाच्या प्रमुख अधिकाºयाने सांगितले की,‘मला माहीत नाही की या बातम्या कोठून येतात. आम्ही आयोजन स्थळ हलवण्याबाबत आमची ओडिशा सरकारशी कोणतीही चर्चा
झालेली नाही. आम्ही ओडिशा सरकारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत.
त्यांनी सांगितले की, स्टेडिअमचे किरकोळ नुकसान झाले आहे. हॉकी इंडियाचे अधिकारी टर्फची पाहणी करण्यासाठी या आठवड्यात भुवनेश्वरला जातील आणि टीम हॉटेलच्या स्थितीचीदेखील माहिती घेतील.’(वृत्तसंस्था)
सहा महिनेआधी भुवनेश्वरमध्ये एफआयएच विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भुषवले होते. मात्र गेल्या आठवड्यातील चक्रीवादळामुळे शहराचे खूप नुकसान झाले आहे. कलिंगा स्टेडिअमलादेखील याचा फटका बसला. ओडिशा सरकारच्या क्रीडा विभागाच्या मते स्टेडिअमचे फारसे नुकसान झालेले नाही. ही स्पर्धा निर्धारित वेळेनुसारच होईल.