कांस्य कायम राखण्याची प्रतिष्ठा पणाला, भारताची तिसऱ्या स्थानासाठी लढत आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:32 AM2017-12-10T00:32:44+5:302017-12-10T00:32:59+5:30
पावसात झालेल्या उपांत्य सामन्यात आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाकडून ०-१ ने पराभूत झालेला भारतीय संघ आज रविवारी विश्व हॉकी लीगमधील तिस-या स्थानासाठी होणारा सामना जिंकून कांस्य कायम राखण्याच्या निर्धाराने खेळणार आहे.
भुवनेश्वर : पावसात झालेल्या उपांत्य सामन्यात आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाकडून ०-१ ने पराभूत झालेला भारतीय संघ आज रविवारी विश्व हॉकी लीगमधील तिस-या स्थानासाठी होणारा सामना जिंकून कांस्य कायम राखण्याच्या निर्धाराने खेळणार आहे. रायपूर येथे मागच्या वर्षी झालेल्या स्पर्धेत भारताने कांस्य जिंकले होते.
यंदा उपांत्यपूर्व लढतीत बेल्जियमवर सडन डेथमध्ये विजय साजरा करताच संघाकडून अपेक्षा उंचावल्या होत्या पण अर्जेंटिनाने आशेवर पाणी फेरले. पावसाच्या व्यत्ययात खेळाडूंची प्रतिष्ठा पणला लागली होती. त्यात अर्जेंटिनाचे खेळाडू भारतीय खेळाडूंवर तांत्रिकदृष्ट्या वरचढ ठरले. आम्हीच नंबर वन का, हे अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी सिद्ध केले.
पेनल्टी कॉर्नर हा भारताच्या चिंतेचा विषयी आहे. भारतीय संघात सातत्याचा अभाव असल्याचा आरोप फेटाळताना कर्णधार मनप्रीतसिंग याने मिळालेल्या संधीचे सोने करण्यात अपयश आल्याची मात्र कबुली दिली. हवामान खात्याने रविवारी आकाश निरभ्र राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. याच मैदानावर पुढील वर्षी विश्वचषकाचे आयोजन देखील होणार आहे.
(वृत्तसंस्था)
कांस्य जिंकण्यावर फोकस करू: कोच मारिन
उपांत्य सामन्यात अर्जेंटिनाकडून झालेला पराभव निराशाजनक असल्याचे सांगून आता कांस्य जिंकण्यावर संघ फोकस करेल, असे भारतीय कोच शोर्ड मारिन यांचे म्हणणे आहे. अर्जेंटिनाविरुद्ध पावसाच्या व्यत्ययात खेळाडूंच्या क्षमतेची परीक्षा होती. मी सर्व सामने पुन्हा पाहतो पण, हा सामना यानंतर कधी पाहणार नाही. अर्जेंटिना संघ आमच्या तुलनेत सरस ठरला. पराभवाचे शल्य बाळगणार नाही. मी खेळाडूंना हेच सांगितले. कांस्य जिंकण्याच्या निर्धारानेच खेळा, असाही सल्ला दिला आहे. आॅलिम्पिक चॅम्प्पियन आणि जगातील अव्वल स्थानावरील संघाविरुद्ध आम्ही पराभूत झालो ही चांगली कामगिरी म्हणावी लागेल, असे मारिन यांनी स्पष्ट केले.