National sports day: आॅलिम्पिक सुवर्णयुगाचे शिल्पकार मेजर ध्यानचंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 06:40 AM2018-08-29T06:40:18+5:302018-08-29T10:54:40+5:30
अफलातून खेळामुळे बनले हॉकीचे जादूगार
भारतीय क्रीडाक्षेत्राचे नाव जगाच्या नकाशावर नेणारे दिग्गज हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची बुधवारी जयंती. त्यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करून हॉकीच्या या जादुगाराला देशभर मानवंदना देण्यात येते. इंग्रज अधिकाऱ्यांविरुद्ध झालेल्या एका सामन्यात मेजर ध्यानचंद यांच्या स्टिकबरोबरच पळणारा चेंडू पाहून त्यांच्या हॉकीस्टिकला चुंबकासारखा काही प्रकार तर लावला नाही ना याची तपासणी करण्यात आली होती. तालबद्ध हालचाली, नजरेत भरणारे फुटवर्क आणि चेंडूवरील जबरदस्त हुकूमत त्हेच त्यांच्या यशाचे खरे गमक होते आणि त्यामागे होते प्रचंड कष्ट आणि नियमित सराव. त्यांच्या अफलातून खेळामुळेच त्यांना हॉकीचे जादुगर म्हटले जाते.
मेजर ध्यानचंद यांचा जन्म प्रयाग (इलाहाबाद) येथे २९ आॅगस्ट १९०५ रोजी झाला होता. सहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर १९२२ मध्ये ध्यानचंद सैन्यदलात भरती झाले. तो पर्यंत त्यांच्या मनामध्ये हॉकीविषयी रुची नव्हती. मात्र, त्यानंतर त्यांनी इतिहास घडविला.
१९३२ साली लॉस एंजिलिस येथे झालेल्या आॅलिम्पिकमध्ये भारताने दुसरे सुवर्ण जिंकले. या स्पर्धेत भारतातर्फे २४ गोल नोंदविले गेले होते. त्यापैकी ८ गोल ध्यानचंद यांनी नोंदविले होते. ‘द गोल’ या आपल्या पुस्तकामध्ये १९३६ च्या आॅलिम्पिक स्पर्धेची चर्चा करताना ध्यानचंद यांनी लिहिले की, अकराव्या बर्लिन आॅलिम्पिकमधील हॉकीचा अंतिम सामना जर्मनीविरुद्ध दि. १४ आॅगस्टला होणार होता. परंतु पाऊस आल्यामुळे हा सामना १५ आॅगस्टला खेळला जाणार होता. भारतीय खेळाडूमध्ये जर्मनीच्या खेळाडू विषयी दहशत निर्माण झाली कारण सराव सामन्यामध्ये यापूर्वी जर्मनीने १-४ ने हरविले होते. १५ आॅगस्टला आम्ही सर्व खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये एकत्र झालो. सर्व खेळाडूंच्या समोर ठेवलेला तिरंगा झेंडा जणू काही आम्हाला सांगत होता की, आता माझी लाज तुमच्या हातामध्ये आहे. आम्ही वीर सैनिकाप्रमाणे मैदानात उतरलो आणि ८-१ ने विजयी झालो, त्यादिवशी खरोखरच तिरंग्याची लाज राखली गेली. त्यावेळी कोणाला कल्पनाही नव्हती, की पुढे १५ आॅगस्टच भारताचा स्वातंत्र्य दिन ठरेल.