नेहरु चषक : अंतिम सामन्यात हॉकी खेळाडूंमध्ये झाली हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 04:53 AM2019-11-26T04:53:39+5:302019-11-26T04:53:49+5:30
पंजाब पोलीस आणि पंजाब नॅशनल बँक या संघातील ५६व्या नेहरुचषक हॉकी स्पर्धेची अंतिम लढत गाजली ती खेळाडूंमध्ये झालेल्या मारामारीमुळे.
नवी दिल्ली : पंजाब पोलीस आणि पंजाब नॅशनल बँक या संघातील ५६व्या नेहरुचषक हॉकी स्पर्धेची अंतिम लढत गाजली ती खेळाडूंमध्ये झालेल्या मारामारीमुळे. सोमवारी झालेल्या या अंतिम सामन्यात दोन्ही संघांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीनंतर आयोजकांनी दोन्ही संघांवर बंदी घातली. या प्रकरणानंतर हॉकी इंडियाने स्पर्धेच्या आयोजकांकडून सविस्तर अहवाल मागविला आहे.
दोन्ही संघांनी सामन्यात ३-३ अशी बरोबरी साधल्यानंतर हा सगळा राडा झाला. पीएनबी संघाने पंजाब पोलीस संघाच्या सर्कलमध्ये मुसंडी मारत चेंडूवर वर्चस्व राखले होते. यावेळी दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर खेळाडूंनी टर्फवरच एकमेकांवर हल्ला केला. खेळाडूंनी एकमेकांना ठोसे मारतानाच हॉकी स्टीकनेही प्रहार केला. यानंतर सामनाधिकारी मध्यस्ती करण्यासाठी मैदानावर आले. काहीवेळ सामना थांबविण्यात आल्यानंतर पुन्हा खेळ सुरु झाला आणि दोन्ही संघातून प्रत्येकी ८ खेळाडू खेळविण्यात आले. दोन्ही संघांच्या प्रत्येकी ३ खेळाडूंना लाल कार्ड दाखवून बाहेर करण्यात आले. अखेर पीनएबीने सामना ६-३ असा जिंकला.
यानंतर जवाहरलाल नेहरु हॉकी स्पर्धा सोसायटीच्या व्यवस्थापक समितीने दोन्ही संघांवर बंदीची कारवाई केली. स्पर्धा आयोजकांनी सांगितले की, ‘दोन्ही संघांवर स्पर्धेत सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे. पंजाब पोलीस संघावर चार वर्षांची, तर पीएनबीवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय संघांच्या व्यवस्थापनाला दोषींवर कठोर कारवाई करण्यास सांगण्यात येईल.’ हॉकी इंडियाच्या सीईओ इलेना नॉर्मन यांनी सांगितले की, ‘आम्ही स्पर्धा आयोजकांच्या अधिकृत अहवालाच्या प्रतीक्षेत आहोत. या आधारावर हॉकी इंडिया नक्कीच कठोर कारवाई करेल.’