आर्थिक चणचण : पाक हॉकी संघ विश्वचषकास मुकणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 02:10 AM2018-11-09T02:10:37+5:302018-11-09T02:11:36+5:30
येत्या २८ नोव्हेंबरपासून भारतात भुवनेश्वर येथे आयोजित होत असलेल्या पीएचएफ हॉकी विश्वचषकात सहभागी होण्याच्या पाकिस्तान संघाच्या आशा धुळीस मिळताना दिसत आहेत.
कराची - येत्या २८ नोव्हेंबरपासून भारतात भुवनेश्वर येथे आयोजित होत असलेल्या पीएचएफ हॉकी विश्वचषकात सहभागी होण्याच्या पाकिस्तान संघाच्या आशा धुळीस मिळताना दिसत आहेत. आर्थिक चणचण असल्याने खेळाडूंना भुवनेश्वरला पाठविणे तसेच खेळाडूंची थकबाकी चुकविण्यासाठी हॉकी महासंघाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे(पीसीबी) उसणवारीने पैसे देण्याची विनंती केली होती, पण पीसीबीने नकार दिला.
पाक हॉकीने नवे मुख्य कोच ताकिर दार आणि व्यवस्थापक हसन सरदार यांनी पीसीबी प्रमुख एहसान मनी यांच्याकडे विश्वचषकाच्या खर्चासाठी उसणवारीने पैशाची मागणी केल्याच्या वृत्तास दुजोरा दिला.
दार म्हणाले,‘आम्ही आज गुरुवारी बैठक घेणार होतो. पण अत्यावश्यक कारणांमुळे मनी यांनी आम्हाला फोनवर माहिती देत पीएचएफला उसणे पैसे देण्यास असमर्थता दर्शविली आहे. पीसीबीने तौकिर झिया यांच्या कार्यकाळात हॉकी महासंघाला दिलेले उसणे पैसे अद्याप परत आले नाहीत, असे मनी यांचे म्हणणे होते. तुम्हाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आम्ही सरकार आणि प्रायोजकांना आवाहन करू, असे मनी यांनी आश्वासन दिले.
पीसीबीचे सचिव शाहबाज अहमद यांनी देखील हॉकी विश्वचषकात सहभागी होण्याची राष्टÑीय संघाची शक्यता क्षीण होत असल्याची कबुली दिली आहे. पीएचएफने सरकारकडे ८० लाखाचे अनुदान मागितले होते. त्यावर अद्यापही उत्तर आलेले नाही. ते म्हणाले,‘आम्ही पंतप्रधान सचिवालयाला आठवडाभरात अनुदान देण्यासाठी पत्र लिहिले. काही उत्तर आले नाही तर संघाला भारतात पाठविणे शक्य होणार नाही. विश्वचषक १६ डिसेंबरपर्यंत रंगणार आहे.
शाहबाज पुढे म्हणाले,‘भारतात आम्ही संघ पाठवू शकलो नाही तर हॉकी विश्वात आमची प्रतिमा डागाळेल शिवाय एफआयएचकडून आर्थिक दंड देखील आकारला जाईल. सरकारने एफआयएचला थेट पैसे देण्याऐवजी खेळाडूंच्या हॉटेलचा खर्च आणि खेळाडूंची थकबाकी स्वत: द्यावी, असे आम्ही मनी यांच्यामार्फत पंतप्रधानांना आवाहन केले.’
पाक खेळाडूंना आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्याआधी घेण्यात आलेल्या राष्टÑीय शिबिरातील दैनिक भत्त्याची रक्कम अद्यापही मिळालेली नाही. दुसरीकडे भारतीय उच्चायुक्तालयाला पीएचएफने व्हिाासाठी आधीच अर्ज केला आहे. दोन वर्षांआधी व्हिसा नाकारण्यात आल्यामुळे भारतात आयोजित ज्युनियर विश्वचषकात पाक संघ सहभागी होऊ शकला नव्हता. विश्वचषकासाठी तयारी शिबिर बुधवारपासून लाहोर येथे सुरू देखील झाले आहे.(वृत्तसंस्था)