भारतीय संघ कागदावर मजबूत, पाक प्रशिक्षक फरहत खान यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 04:11 AM2017-09-22T04:11:10+5:302017-09-22T04:11:12+5:30
पाकिस्तान हॉकी संघाचे प्रशिक्षक फरहत खान यांनी बांगलादेशात पुढील महिन्यात होणा-या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ हा कागदावर मजबूत संघ असल्याचे म्हटले आहे.
ढाका : पाकिस्तान हॉकी संघाचे प्रशिक्षक फरहत खान यांनी बांगलादेशात पुढील महिन्यात होणा-या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ हा कागदावर मजबूत संघ असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानला भारत, जापान आणि यजमान बांगलादेशसोबत पूल ए मध्ये ठेवण्यात आले आहे. ११ आॅक्टोबरला पाकिस्तानचा पहिला सामना यजमान बांगलादेशविरुद्ध, १३ आॅक्टोबरला जापान आणि १५ रोजी भारतासोबत होईल.
फरहत यांनी सांगितले की,‘स्पर्धेत सहभागी झालेल्या आशियाई संघांमध्ये कडवी स्पर्धा आहे. जागतिक रँकिंगमध्ये सहाव्या क्रमांकावर असलेला भारतीय संघ कागदावर मजबूत आहे. मात्र अनेक संघ कधीही प्रतिस्पर्ध्यांना चकित करून सोडतात. मलेशियाने लंडनमध्ये विश्व हॉकी लीग सेमीफायनलमध्ये भारताला पराभूत केले. त्यामुळे आम्ही खेळावर लक्ष देऊ.’’
फरहत पुढे म्हणाले की, ‘आम्हाला खेळातील प्रत्येक विभागाकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे. गेल्या काही काळापासून आमच्या संघाला कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला आहे. तसेच, गेल्या विश्वचषक आणि रियो आॅलिम्पिक स्पर्धेमध्ये पात्रता मिळवण्यातही आम्ही अपयशी ठरलो. त्यामुळे आशिया कपमध्ये आम्ही सर्वोत्तम खेळ करण्यास उत्सुक आहोत.’ (वृत्तसंस्था)