राणी रामपालकडे असणार नेतृत्वाची धुरा; सविताकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 03:38 AM2018-07-07T03:38:10+5:302018-07-07T03:38:21+5:30
फॉरवर्ड राणी रामपाल १८ आॅगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान इंडोनेशियात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व करील. अनुभवी गोलकिपर सविता संघाची उपकर्णधार असेल.
नवी दिल्ली : फॉरवर्ड राणी रामपाल १८ आॅगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान इंडोनेशियात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व करील. अनुभवी गोलकिपर सविता संघाची उपकर्णधार असेल. भारतीय महिला हॉकी संघाने राणी रामपाल हिच्या नेतृत्वाखाली गतवर्षी आशिया चषक स्पर्धा जिंकली होती. गोलरक्षक इतिमर्पू हिला प्रतिष्ठित स्पर्धेसाठी राखीव गोलकिपर म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकून २0२0 च्या टोकियो आॅलिम्पिकसाठी थेट पात्रता मिळवण्याच्या निर्धाराने खेळेल.
भारताने २0१७ मध्ये आशिया चषकमध्ये विजेतेपद आणि एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीत २0१६ साली अजिंक्यपद आणि २0१८ मध्ये उपविजेतेपद पटकावून आशियाई स्तरावर स्वत:ला मजबूत संघ म्हणून समोर आणले आहे. भारताला जगातील आठव्या आणि नवव्या क्रमांकातील अनुक्रमे चीन आणि दक्षिण कोरियाकडून आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सुवर्णपदकाच्या मार्गात खडतर आव्हान असेल.
मुख्य प्रशिक्षक शॉर्ड मारिन म्हणाले, ‘संघात अनुभवी व युवा खेळाडूंचे योग्य संमिश्रण आहे. सर्वात आनंदाची बाब म्हणजे सर्वांकडे मोठ्या सामन्यात खेळण्याचा अनुभव आहे.’ त्याचबरोबर त्यांनी सांगितले की, ‘२१ जुलैपासून लंडन येथे सुरू होणाºया विश्वचषक स्पर्धेत संघाच्या कामगिरीचा परिणाम १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेवर पडेल. लंडन येथे खेळणे आशियाई स्पर्धेआधी संघाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी चांगले असेल. खेळाडू कोणत्याही संघाविरुद्ध जिंकण्यास सक्षम आहेत.’ (वृत्तसंस्था)
भारतीय महिला हॉकी संघ
गोलरक्षक : सविता (उपकर्णधार), रजनी इतिमर्पू
बचावपटू : सुनीता लाकरा, दीप ग्रेस इक्का, दीपिका, गुरजित कौर, रिना खोखर
मध्यरक्षक : नमिता टोप्पो, लिलिमा मिंज, मोनिका, उदिता, नेहा गोयल, निक्की प्रधान
आक्रमक : राणी रामपाल (कर्णधार), वंदना कटारिया, नवनीत कौर, लालरेमसियामी, नवजोत कौर