सरदार सिंगकडे पुन्हा भारतीय संघाची धुरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 02:24 AM2018-02-21T02:24:52+5:302018-02-21T02:25:01+5:30
भारताचा अनुभवी मिडफिल्डर सरदार सिंगकडे दोन वर्षांनंतर पुन्हा भारतीय संघाची धुरा सोपविण्यात आली आहे. इपोह (मलेशिया) येथे ३ ते १० मार्चदरम्यान होणा-या २७ व्या सुलतान अझलन शाह
नवी दिल्ली : भारताचा अनुभवी मिडफिल्डर सरदार सिंगकडे दोन वर्षांनंतर पुन्हा भारतीय संघाची धुरा सोपविण्यात आली आहे. इपोह (मलेशिया) येथे ३ ते १० मार्चदरम्यान होणा-या २७ व्या सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रमनदीप सिंगकडे उपकर्णधारपद देण्यात आले. आपल्या कारकिर्दीतील अखेरच्या टप्प्यात असलेल्या सरदारचे स्थान गेल्या काही काळापासून संघात अनिश्चित होते. तसेच, गेल्या दोन स्पर्धांसाठी नावाचा विचारही झाला होता. याआधी आशिया चषक स्पर्धेत त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. यानंतर डिसेंबरमध्ये झालेल्या हॉकी विश्व लीग फायनल आणि न्यूझीलंद दौ-यासाठी त्याची निवड झाली नव्हती.
प्रशिक्षक शूअर्ड मारिन यांनी सरदारला एक आणखी संधी दिली असून नियमित कर्णधार मनप्रीत सिंगला विश्रांती देण्यात आल्याने संघाची धुराही त्याच्याकडे सोपविली आहे. मारिन म्हणाले, ‘संघाच्या कोर ग्रुपमध्ये सरदार प्रमुख खेळाडू असून तो अनुभवी आहे. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडे ही एक संधी असेल.’