2016 पासून महिला हॉकीत लक्षणीय सुधारणा झाली!, कर्णधार राणी रामपालचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 08:35 AM2022-01-01T08:35:14+5:302022-01-01T08:35:56+5:30
Rani Rampal : २०१६ च्या रिओ ते २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकपर्यंतच्या प्रवासात भारतीय महिला हॉकीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे मत २७ वर्षांच्या राणीने व्यक्त केले.
नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालच्या मते टोकियो ऑलिम्पिकमधील अविस्मरणीय कामगिरीमुळे खेळाडूंना अत्यंत दडपणाच्या स्थितीतही शानदार खेळ करण्याचा मंत्र मिळाला. २०१६ च्या रिओ ते २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकपर्यंतच्या प्रवासात भारतीय महिला हॉकीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे मत २७ वर्षांच्या राणीने व्यक्त केले.
‘हॉकी पे चर्चा’ या पॉडकास्टमध्ये राणीने टोकियोत मिळालेले चौथे स्थान ते २०२१ मधील अनेक संस्मरणीय क्षणांना उजाळा दिला. राणी म्हणाली,‘२०२१ आमच्यासाठी शानदार ठरले. आम्ही टोकियोत पदक जिंकू शकलो असतो. असे करू शकलो नाही याची नेहमीसाठी खंत असेल. पदक मिळविण्याच्या फारच जवळ होतो. पराभव कसा झाला, हे काही काळ पचविणेदेखील जड गेले होते.
‘आम्ही २०१५ ला रिओ ऑलिम्पिकमध्ये १२ व्या आणि २०२० मध्ये टोकियोत चौथ्या स्थानावर राहिलो. भारतीय महिला हॉकीसाठी ही मोठी उपलब्धी आहे. कांस्य जिंकले नाही, पण कामगिरीत आमचे खेळाडू सरस ठरले. टोकियोतून मायदेशात परतलो तेव्हा चाहत्यांनी आमच्या कामगिरीचे कौतुक केले. काही चांगले केल्यामुळेच चाहत्यांचे प्रेम आणि प्रशंसा मिळू शकली. यामुळे भविष्यात उत्कृष्ट कामगिरी करण्याचा विश्वास प्राप्त झाला,’ असे राणीने सांगितले.
‘टोकियोत उपांत्यपूर्व सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा १-० ने पराभव केल्यामुळे आमच्या खेळाडूंमध्ये आत्मविश्वास संचारला. यामुळे उपांत्य सामन्यात विश्वक्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या अर्जेंटिनाला नमवू शकतो, असे वाटले होते. उपांत्य सामना जिंकू शकलो असतो. सुरुवातीपासून आघाडी मिळवून प्रतिस्पर्धी संघावर दडपणही आणले होते. कोचने सांगितलेली प्रत्येक गोष्ट आत्मसात केली. पेनल्टी कॉर्नरही मिळविले, पण त्याचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयशी ठरलो. खेळाडूंसाठी ही शिकण्याची आणि अनुभव मिळविण्याची मोठी संधी ठरली. यापुढे आमचे खेळाडू बाद फेरीच्या सामन्यात संयमी खेळ करू शकतील. आम्ही निश्चितपणे उत्कृष्ट कामगिरी करू,’ असा मला विश्वास आहे.’ - राणी रामपाल