CoronaVirus News: हॉकी टीमचे सहा खेळाडू पॉझिटिव्ह, शिबिर धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 01:16 AM2020-08-12T01:16:22+5:302020-08-12T01:17:01+5:30

महिला संघाचे शिबिर मात्र होणार

Six players of hockey team test positive for corona | CoronaVirus News: हॉकी टीमचे सहा खेळाडू पॉझिटिव्ह, शिबिर धोक्यात

CoronaVirus News: हॉकी टीमचे सहा खेळाडू पॉझिटिव्ह, शिबिर धोक्यात

Next

नवी दिल्ली : सहा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाच्या बेंगळुरू येथील शिबिरावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले. दुसरीकडे सर्व खेळाडूंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर २० आॅगस्टपासून महिला शिबिर मात्र सुरू होण्याची शक्यता आहे.

शिबिरासाठी आपापल्या घरून दाखल झालेल्या या खेळाडूंपैकी कर्णधार मनप्रीतसिंग, स्ट्रायकर मनदीपसिंग, बचावफळीतील सुरेंदर कुमार आणि जसकरणसिंग ड्रॅगफ्लिकर, वरुण कुमार आणि गोलकीपर कृष्णबहादूर पाठक या सहा जणांना कोरोना झाला. मनदीपला सोमवारी श्वास घेण्यास त्रास झाल्याने इस्पितळात हलविण्यात आले.

‘सहा खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने शिबिराबाबत अनिश्चितता कायम आहे. राज्य सरकार काय पाऊल उचलते याची प्रतीक्षा करीत आहोत,’ असे साइच्या सूत्रांनी सांगितले. ‘महिला खेळाडू निगेटिव्ह आल्यानंतर त्यांचे शिबिर मात्र सुरू होईल. सर्व खेळाडू १४ दिवसांच्या विलगीकरणात आहेत. त्यानंतर हलका सराव सुरू होईल.

सध्या शिबिरात ३३ पुरुष आणि २४ महिला खेळाडू आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या सहा जणांमध्ये अनेक जण पंजाबमधील आहेत. त्यांच्यापैकी एकूण दहा जणांनी नवी दिल्लीहून सोबत प्रवास केला होता. अन्य चार जणांचे अहवाल यायचे आहेत. खेळाडूंना एक महिना ब्रेक देण्यात आल्याने सर्वजण घरी गेले होते. हॉकी इंडियाच्या आग्रहामुळे साइने शिबिरास मान्यता दिली होती,’ असे या सूत्रांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)

‘ही हॉकी इंडियाची चूक आहे. ब्रेकच्या काळात त्यांनी खेळाडूंवर नजर ठेवायला हवी होती. भविष्यातील पिढीपुढे आदर्श उदाहरण ठेवणाऱ्या या खेळाडूंनी अधिक सावध असायला हवे. त्यांनी विलगीकरणाचे कठोरपणे पालन केले नसावे. याशिवाय महासंघानेदेखील खेळाडूंप्रति सावध राहायला हवे होते. नोव्हेंबरमध्ये आशियाई चॅम्पियनशिप वगळता अन्य कुठल्याही मोठ्या स्पर्धेत भाग घ्यायचा नाही, मग शिबिर आताच सुरू करण्याची गरज होती का?’
- अजितपालसिंग, माजी कर्णधार

Web Title: Six players of hockey team test positive for corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.