Tokyo Olympics: खेळाडू, प्रशिक्षकांसोबतच सर्वजण यशाचे भागीदार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 05:22 AM2021-08-08T05:22:16+5:302021-08-08T05:22:45+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला टोकियोला जाण्यापूर्वी प्रोत्साहित केले. तसेच पदक जिंकल्यावर लगेच त्यांचा फोन आला यानेदेखील मन भरून आले. त्यापेक्षा कोणतीही मोठी प्रेरणा असू शकत नाही.
- मनप्रीत सिंह
आम्ही गेल्या २४ तासांमध्ये भावनांच्या झोपाळ्यावर होतो. पुरुष हॉकी संघाने कांस्य पदक पटकावले आणि महिला हॉकी संघाने चौथे स्थान मिळवले. त्यामुळे संपूर्ण देशात हॉकीबाबत आनंददायी वातावरण निर्माण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला टोकियोला जाण्यापूर्वी प्रोत्साहित केले. तसेच पदक जिंकल्यावर लगेच त्यांचा फोन आला यानेदेखील मन भरून आले. त्यापेक्षा कोणतीही मोठी प्रेरणा असू शकत नाही. ऑलिम्पिक पदक जिंकण्यापेक्षा कोणतेही उत्तम बक्षीस असू शकत नाही. खेळाडू, प्रशिक्षक, स्टाफ यांची मेहनत होती.
या प्रवासात अनेकांनी सहकार्य केले. त्यात भारत सरकार, ओडिशा सरकार, हॉकी इंडियाचे नेतृत्वाने एकत्रितपणे तयारी करून आम्हाला ऑलिम्पिकच्या तयारीसाठी सर्वोत्तम दिले. आम्ही ४१ वर्षांनी पदक मिळवले
आता मागे वळून बघायला हरकत नाही. याची सुरुवात मार्च २०२० मध्ये झाली क्रीडा मंत्रालयाने आम्हाला १० मार्चलाच लॉकडाऊनसाठी तयार रहायला सांगितले होते. हे कठीण होते. पण महामारी पसरल्यानंतर आम्हाला या निर्णयाचे महत्त्व कळले. आम्ही साईच्या बंगळुरूतील केंद्रात होतो. बाहेरच्या जगापासून अलिप्त होतो. या काळात आमच्यात सौहार्दाचे वातावरण निर्माण झाले. त्याचा परिणाम आमची ताकद वाढली.
जेव्हा आम्ही प्रशिक्षण पुन्हा सुरू केले. तेव्हा देखभाल करणारे कर्मचारी नसल्याने टर्फ निसरडा झाला होता. आमच्याकडे स्टाफ देण्यास अधिकाऱ्यांनी परवानगी लवकर दिली नाही. नंतर वचनबद्ध कर्मचारी मिळाले. त्यांनी आम्हाला सराव करण्यासाठी टर्फ स्वच्छ केला. आम्ही पुन्हा परतलो. कोविड प्रोटोकॉलमुळे दोन आठवडे विलगीकरणात घालवावे लागले. आम्हाला जे हवे होते ते सर्व काही आमच्या रूममध्ये मिळत होते. हॉकी इंडियाने सरावसाठी पुरेशी व्यवस्था करून दिली.
ऑलिम्पिकच्या आधी आम्ही ज्युनियर खेळाडूंसह सराव केला. साईने आम्हाला गरज पडल्यास रुग्णालयात दाखल करण्यासाठी आधीच तयारी करून ठेवली होती. याचे महत्त्व तेव्हा लक्षात आले जेव्हा सुरेंद्र कुमारला पोस्ट कोविडमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आम्हाला माहित होते की तो लवकर परत येणार आहे. डिसेंबर २०१९ मध्ये संघाचा समावेश टॉप्समध्ये करण्यात आला. या यशाने खेळाडू आणि प्रशिक्षक प्रकाश झोतात आले मात्र बंगळुरूतील नॅशनल सेंटर ऑफ एक्सेलन्सच्या स्टाफचे देखील आभार मानायला हवे. ही जागा फक्त राष्ट्रीय सराव शिबिर नसून आमच्यासाठी एक आध्यात्मिक घर आहे.