Tokyo Olympics: ‘चक दे इंडिया’ अन् कबीर खानशी तुलना...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 06:45 AM2021-08-03T06:45:57+5:302021-08-03T06:46:32+5:30
Tokyo Olympics Update: भारतीय महिला हॉकी संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला नमवून ऐतिहासिक उपांत्य फेरी गाठली. लगेचच संघावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला.
टोकियो : भारतीय महिला हॉकी संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला नमवून ऐतिहासिक उपांत्य फेरी गाठली. लगेचच संघावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. सोशल मीडियात ‘चक दे’ ट्रेंड करीत आहे. शाहरूख खान आणि कबीर खान हेदेखील ट्रेंड होऊ लागले. महिला संघाचे प्रशिक्षक शोर्ड मारिन यांची तुलना ‘चक दे इंडिया’चील शाहरूखने साकारलेल्या प्रशिक्षकाच्या व्यक्तिरेखेशी कबीर खानशी केली जात आहे.
प्रशिक्षक शोर्डचेही उत्तर
- किंग खानच्या ट्विटला उत्तर देताना शोर्ड म्हणाले, 'पाठिंबा आणि प्रेमाबद्दल धन्यवाद. सामना जिंकण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू. तुमचा सध्याचा प्रशिक्षक.'
- या दोघांच्याही प्रतिक्रियांवर नेटकऱ्यांनी उड्या घेतल्या. चक दे इंडियामध्ये महिला हॉकी खेळाडूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सागरिका घाटगेने म्हटले, ‘भारतीय महिला हॉकी संघाने पहिल्यांदाच ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठून इतिहास रचला आहे. संपूर्ण संघाचे अभिनंदन. महिला खेळाडूंना खूप शक्ती मिळो.'
शाहरूख म्हणाला...
- या शानदार विजयानंतर स्वत: किंग खान शाहरूखनेही संघाचे अभिनंदन करीत आता सुवर्ण जिंकून या यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. विजयानंतर प्रशिक्षक शोर्ड मारिने यांनी संघासोबतचा एक सेल्फी शेअर केला आणि ट्विट केले ,‘सॉरी फॅमिली, मी पुन्हा परत येत आहे.'
- शोर्डच्या या ट्विटला उत्तर देताना शाहरूख म्हणाला ,‘हो हो, काही हरकत नाही. परत येताना सोने घेऊन या. कुटुंबातील अब्जावधी सदस्यांसाठी. यावेळी धनत्रयोदशीही २ नोव्हेंबरला आहे. तुमचा माजी प्रशिक्षक कबीर खान.’