Tokyo Olympics: ऐतिहासिक! भारताने ४१ वर्षांनंतर हॉकीमध्ये जिंकले पदक, जर्मनीला नमवून केला कांस्य पदकावर कब्जा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 08:53 AM2021-08-05T08:53:03+5:302021-08-05T09:04:09+5:30
Tokyo Olympics Live Updates: आज जर्मनीविरुद्ध झालेल्या कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत भारताने ५-४ असा विजय मिळवत कांस्यपदकावर कब्जा केला.
टोकियो - यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त खेळ करणाऱ्या भारतीय हॉकी संघाने आज ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आज जर्मनीविरुद्ध झालेल्या कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत भारताने ५-४ असा विजय मिळवत कांस्यपदकावर कब्जा केला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत भारतीय संघ एकवेळ १-३ असा पिछाडीवर पडला होता. मात्र या पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारत भारताने ५-३ अशी आघाडी घेतली आणि अखेरीस ५-४ अशा फरकाने विजय मिळवसा भारतीय हॉकी संघाने तब्बल ४१ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे. आज झालेल्या लढतीत सिमरनजीत सिंगने दोन आणि हरमनप्रीत सिंग, रुपिंदर पाल सिंग आणि हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करत भारताच्या या ऐतिहासिक यशात मोलाचा वाटा उचलला.
पहिल्या क्वार्टरमध्ये जर्मनीने जोरदार सुरुवात केली. पहिल्याच मिनिटाला जर्मनीने गोल करून या महत्त्वपूर्ण लढतीत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पहिल्या क्वार्टरमध्ये जर्मनीने पूर्ण वर्चस्व राखले. पहिल्या क्वार्टरच्या अखेरीस जर्मनीला एकापाठोपाठ एक पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र भारतीय संघाने भक्कम बचाव करत हे हल्ले हाणून पाडले. दरम्यान, दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने आक्रमक सुरुवात करत जर्मनीवर प्रतिहल्ला केला. यादरम्यान १७ व्या मिनिटाला सिमरनजीत सिंगने गोल करून भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली. मात्र २४ व्या मिनिटाला निकोलस वेलनने गोल करून जर्मनीला पुन्हा आघाडी मिळवून दिली. तर काही वेळातच २५ व्या मिनिटाला प्युक्सने गोल करून जर्मनीची आघाडी ३-१ अशी वाढवली. मात्र भारताने जर्मनीवर पुन्हा प्रतिहल्ला केला. २७ व्या मिनिटाला हार्दिक सिंगने गोल करून भारताची पिछाडी २-३ अशी कमी केली. तर २९ व्या मिनिटाला हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून भारताला बरोबरी साधून दिली. मध्यांतराला दोन्ही संघ ३-३ अशा बरोबरीत होते.
मध्यांतरानंतरच्या खेळात भारताने पुन्हा आक्रमण करून जर्मनीवर दबाव वाढवला. यादरम्यान, रुपिंदरपाल सिंगने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करून भारताला ४-१ अशी आघाडी मिळवून दिली. तर सिमरनजीत सिंगने गोल करून भारताची आघाडी ५-३ अशी वाढवली. त्यानंतर तिसरा क्वार्टर संपेपर्यंत भारताने ही आघाडी कायम राखली.
दरम्यान, चौथ्या क्वार्टरमध्ये जर्मनीने पुन्हा एकदा भारतावर प्रतिहल्ला करत चौथा गोल केला. मात्र त्यानंतर भारतीय संघाने भक्कम बचाव केला. यादरम्यान भारतीय संघाला गोल करता आला नाही. मात्र जर्मनीचे आक्रमण थोपवत भारताने ५-४ अशी आघाडी अखेरपर्यंत कायम राखली आणि विजय साकारला.