Tokyo Olympics: भारताकडून जपानचा ‘घरच्या मैदानावर’ पराभव, उपांत्यपूर्व फेरीआधी ५-३ ने मात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 06:24 AM2021-07-31T06:24:35+5:302021-07-31T06:25:26+5:30
Tokyo Olympics Updates: गुरजंतसिंगच्या दोन गोलमुळे भारताच्या पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीआधी अखेरच्या साखळी सामन्यात शुक्रवारी जपानचा ५-३ ने पराभव केला. या विजयामुळे संघाच्या आत्मविश्वासात भर पडली आहे.
टोकियो : गुरजंतसिंगच्या दोन गोलमुळे भारताच्या पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीआधी अखेरच्या साखळी सामन्यात शुक्रवारी जपानचा ५-३ ने पराभव केला. या विजयामुळे संघाच्या आत्मविश्वासात भर पडली आहे.
भारताकडून हरमनप्रीतने १३ व्या, गुरजंत १७ आणि ५६, शमशेरसिंग ३४ तसेच नीलकांत शर्मा याने ५१ व्या मिनिटांना गोल केले. जपानकडून केंता तनाकाने १९ व्या, कोता वतानबे ३३ आणि काजुमा मुराता याने ५९ व्या मिनिटाला गोल केले. भारतीय संघाने अ गटात न्यूझीलंड, स्पेन, अर्जेंटिनाला हरविले आहे मात्र ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. उपांत्यपूर्व सामना १ ऑगस्ट रोजी होईल.
दोन्ही संघांनी वेगवान सुरुवात केली. पण जपानचे खेळाडू अधिक जलद होते. १३ व्या मिनिटाला हरमनने पेनल्टीवर गोल नोंदवून खाते उघडले. टोकियोत हरमनचा हा चौथा गोल आहे. दुसऱ्या क्वार्टरमध्येही भारताने आक्रमक खेळ केला. यावेळी गुरजंतने सिमरनजीतच्या पासवर गोल नोंदवून आघाडी दुप्पट केली. प्रत्युत्तरात जपानने हल्ला केला. भारतीय बचावफळी भेदून तनाकाने गोल नोंदविला. यामुळे मध्यंतरापर्यंत भारताची आघाडी २-१ अशी राहिली.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये जपानने सुरुवातीला आणखी एक गोल नोंदवून २-२ अशी बरोबरी साधली.यानंतर सावध झालेल्या शमशेरने नीलकांत शर्माच्या पासवर सुरेख गोल करीत पुन्हा आघाडी मिळवून दिली. दरम्यान गोलकीपर श्रीजेश यानेही प्रतिस्पर्धी खेळाडूंचे हल्ले परतवून शानदार कामगिरी केली. ५६ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर हरमनच्या पासवर गुरजंतने स्वत:चा दुसरा गोल केला. तीन मिनिटानंतर काजुमा मुराता याने तिसरा गोल नोंदविला खरा मात्र पराभवाचे अंतर कमी होऊ शकले नाही.
महिला हॉकीत भारताच्या आशा कायम
टोकियो : ऑलिम्पिकमधील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक असलेल्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने १-० अशी बाजी मारत आयर्लंडला पराभवाचा धक्का दिला. दोन्ही संघांनी बचावावर अधिक भर देत सामन्यात गोलशून्य बरोबरी राखली होती. अखेरच्या काही मिनिटांमध्ये नवनीत कौरने केलेल्या गोलच्या जोरावर भारताने आघाडी मिळवीत विजय मिळविला.
या महत्त्वपूर्ण विजयासह भारतीय संघाने बाद फेरीच्या आपल्या आशा कायम राखल्या आहेत. विशेष म्हणजे आयर्लंडविरुद्ध भारतीय संघाने तब्बल १४ पेनल्टी कॉर्नर मिळविले होते; पण एकही पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावण्यात भारतीयांना यश आले नाही. सामन्यातील एकमेव गोल नवनीतने केला तो ५७ व्या मिनिटाला. सामना संपण्यास काही मिनिटे शिल्लक असताना तिने केलेला गोल निर्णायक ठरला. सामना संपण्याच्या तीन मिनिटे आधी कर्णधार राणी रामपालने नवनीतकडे अचूक पास देत तिला गोल करण्याची संधी निर्माण करून दिली. ही संधी अचूकपणे साधत नवनीतने चेंडू गोलजाळ्यात धाडत भारताचा विजय साकारला.
सलग तीन सामने गमावल्यानंतर भारताला आव्हान कायम राखण्यासाठी विजय मिळविणे अनिवार्य होते आणि यासाठी त्यांना ५७ मिनिटे प्रतीक्षा करावी लागली. भारतीयांनी यावेळी गोल करण्याच्या अनेक संधीही निर्माण केल्या. मात्र, गोल करण्यात त्यांना यश आले नाही.
याआधी भारताला जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या नेदरलँडविरुद्ध १-५, जर्मनीविरुद्ध ०-२ आणि गतविजेत्या ग्रेट ब्रिटनकडून १-४ असा पराभव पत्करावा लागला होता.