Tokyo Olympics: पदक हुकले, पण शानदार खेळाने मन जिंकले! अटीतटीच्या लढतीत भारतीय महिला संघाचा ग्रेट ब्रिटनकडून पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 08:55 AM2021-08-06T08:55:00+5:302021-08-06T09:06:55+5:30
Tokyo Olympics Updates: टोकियो ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघाचे पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. ग्रेट ब्रिटनविरुद्ध झालेल्या अत्यंत अटीतटीच्या लढतीत भारतीय महिला संघाला ३-४ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला.
टोकियो - टोकियो ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघाचे पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. ग्रेट ब्रिटनविरुद्ध झालेल्या अत्यंत अटीतटीच्या लढतीत भारतीय महिला संघाला ३-४ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. या सामन्यात ०-२ ने पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय संघाने ३-२ अशी आघाडी घेतली होती. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये प्रत्येकी एक गोल करत ग्रेट ब्रिटनने हा सामना ४-३ असा फरकाने जिंकला आणि कांस्यपदकावर कब्जा केला. (Indian Women's Hockey team loses to Great Britain, 4-3 in the Bronze Medal match)
सामन्यातील पहिल्या क्वार्टरमध्ये ब्रिटनच्या संघाने आक्रमक खेळ केला. यादरम्यान, ब्रिटीश संघाला काही पेनल्टी कॉर्नरही मिळाले. मात्र भारतीय गोलरक्षक सविता पुनिया आणि बचाव फळीने भक्कम बचाव करत ब्रिटीश आक्रमणाला थोपवून धरले. त्यामुळे पहिल्या क्वार्टरच्या अखेरीस गोलफलक ०-० अशा बरोबरीत राहिला.
मात्र दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीलाच ब्रिटिश खेळाडूंनी भारतीय बचावफळी भेदत जोरदार मुसंडी मारली. दुसऱ्या क्वार्टरमधील पहिल्याच मिनिटाला एलेना रायरने गोल करत ग्रेट ब्रिटनने गोल करून १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर सारा रॉबर्टसनने केलेल्या गोलच्या जोरावर ब्रिटनने आपली आघाडी २-० अशी वाढवली. मात्र ०-२ अशा पिछाडीवर पडलेल्या भारतीय महिला संघाने सामन्यात जोरदार पुनरागमन केले. गुरजित कौरने भारताला मिळालेल्या दोन पेनल्टी कॉर्नरवर दोन गोल करत भारताची पिछाडी भरून काढत संघाला २-२ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर मध्यांतराला काही वेळ बाकी असताना २९ व्या मिनिटाला वंदना कटारियाने ब्रिटनचा बचाव भेदत गोल केला आणि भारताला ३-२ ने आघाडी मिळवून दिली.
मध्यांतरानंतरच्या खेळात ग्रेट ब्रिटनने पुन्हा एकदा जोरदार आक्रमण केले आणि सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतर संपूर्ण क्वार्टरवर ब्रिटनच्या खेळाडूंनी वर्चस्व राखले. दरम्यान, तिसऱ्या क्वार्टरच्या शेवटच्या काही सेकंदात भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र त्याचा भारताला फायदा घेता आला नाही. त्यानंतर चौथ्या आणि निर्णायक क्वार्टरमध्ये ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूंनी आक्रमणाची धार वाढवत भारतावर दबाव आणला आणि सामन्यातील ४८ व्या मिनिटाला गोल करून ग्रेट ब्रिटनने सामन्यातर ४-३ अशी आघाडी घेतली. त्यानंतर ही आघाडी अखेरपर्यंत कायम राखत ब्रिटनने सामन्यावर आणि टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्यपदकावर कब्जा केला.