Tokyo Olympics: भारताच्या दोन्ही संघांची उपांत्यफेरीत धडक हा आश्चर्याचा धक्का: दिलीप तिर्की
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 06:57 AM2021-08-03T06:57:39+5:302021-08-03T06:58:22+5:30
Indian Hockey in Tokyo Olympics: ‘भारताच्या पुरुष आणि महिला हाॅकी संघाने टोकियो ऑलिम्पिकची उपांत्यफेरी गाठणे हा हॉकी चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्का आहे,’ हॉकी संघाचा माजी कर्णधार दिलीप तिर्की याने भारतीय खेळाडूंच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
- नीलेश देशपांडे
नागपूर : ‘भारताच्या पुरुष आणि महिला हाॅकी संघाने टोकियो ऑलिम्पिकची उपांत्यफेरी गाठणे हा हॉकी चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्का आहे,’ हॉकी संघाचा माजी कर्णधार दिलीप तिर्की याने भारतीय खेळाडूंच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
सलग तीनवेळा ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करीत कारकिर्दीत ४१२ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले तिर्की पुढे म्हणाले, ‘हॉकीपटूंना अशा कामगिरीची प्रतीक्षा होतीच. प्रथमच दोन्ही संघांनी ऑलिम्पिकची उपांत्यफेरी गाठणे कौतुकास्पद आहे. हा मोठा क्षण आहे, दोन्ही संघांचा खेळ पाहणे फारच सुखद ठरले. पुरुष संघाने काल ब्रिटनविरुद्ध आणि महिला संघाने आज ऑस्ट्रेलियासारख्या मातब्बर संघाविरुद्ध केलेली कामगिरी शारीरिक आणि मानसिक कणखरतेचे प्रतीक ठरली. दोन्ही संघांनी आता ताजेतवाने होऊन उपांत्य सामन्यातदेखील आपल्या रणनीतीवर कायम राहायला हवे. ‘तुम्ही चांगली कामगिरी करू शकता’, याची शाश्वती मिळाल्यास युवा खेळाडू किती अप्रतीम कामगिरी करू शकतात हे दोन्ही संघांनी उपांत्यफेरी गाठून दाखवून दिले आहे. संघाच्या यशात विदेशी कोचेसचे योगदान मोठे असल्याचे सांगून पद्मश्री तसेच अर्जुन पुरस्काराचे मानकरी माजी राज्यसभा सदस्य तिर्की पुढे म्हणाले, ‘महिला संघासोबत कोच सोजर्ड मारजिने दीर्घकाळापासून आहेत. भारतीय खेळाडूंची मानसिकता बदलण्यात विदेशी कोच उपयुक्त ठरले यात शंका नाही.’