Tokyo Olympics: वंदना कटारियाची हॅटट्रिक, रोमांचक लढतीत भारतीय महिला संघाची दक्षिण आफ्रिकेवर मात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 11:17 AM2021-07-31T11:17:31+5:302021-07-31T11:18:41+5:30
Indian women's Hockey team, Tokyo Olympics Live Updates: वंदना कटारियाने (Vandana Kataria) केलेल्या शानदार हॅटट्रिकच्या जोरावर अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत भारतीय महिला हॉकी संघाने (Indian women's Hockey team)दक्षिण आफ्रिकेवर ४-३ अशी मात केली.
टोकियो - वंदना कटारियाने (Vandana Kataria) केलेल्या शानदार हॅटट्रिकच्या जोरावर अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत भारतीय महिला हॉकी संघाने (Indian women's Hockey team)दक्षिण आफ्रिकेवर ४-३ अशी मात केली. या विजयासोबतच भारतीय महिला संघाने ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. भारताकडून वंदना कटारियाने तीन आणि नेहा गोयल हिने एक गोल केला. दरम्यान, वंदना कटारिया ही ऑलिम्पिकमध्ये हॅटट्रिक नोंदवणारी वंदना कटारिया ही भारताची महिला हॉकीपटू ठरली आहे. (Vandana Kataria's hat-trick, Indian women's Hockey team defeats South Africa in thrilling match)
उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी भारतीय महिला संघाला विजय मिळवणे आवश्यक होते. दरम्यान, भारताने सामन्यात सुरुवातही जोरदार केली. सामन्यातील चौथ्या मिनिटालाच वंदना कटारियाने सुरेख गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर संपूर्ण पहिल्या क्वार्टरवर भारताचे वर्चस्व राहिले. मात्र पहिला क्वार्टर संपण्यासाठी काही मिनिटे उरली असताना दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी भारताचा बचाव भेदून बरोबरी साधली. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्येही पहिल्या क्वार्टरचीच पुनरावृत्ती झाली. १७ व्या मिनिटाला वंदना कटारियाने दुसरा गोल करता भारताला पुन्हा आघाडी मिळवून दिली. मात्र पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी अखेरच्या क्षणी कामगिरी उंचावत गोल केला आणि मध्यांतराला सामना २-२ अशा बरोबरीत आणला.
#TokyoOlympics | India beat South Africa by 4-3 in Women Hockey Pool A match. pic.twitter.com/aOx4V2WHqK
— ANI (@ANI) July 31, 2021
तिसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला भारताने पुन्हा एकदा आघाडी घेतली. यावेळी ३२ व्या मिनिटाला कर्णधार राणी रामपाल हिने मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा फायदा उचलत दिलेल्या पासवर नेहा गोयल हिने गोल केला आणि भारताला ३-२ असे आघाडीवर नेले. मात्र भारताची ही आघाडीही फार काळ टिकली नाही. ३९ व्या मिनिटाला दक्षिण आफ्रिकेने अजून एक गोल करत पुन्हा बरोबरी साधली. अखेर शेवटच्या क्वार्टरमध्ये ४९ व्या मिनिटाला वंदना कटारियाने सामन्यातील आपला तिसरा गोल करून भारताला सामन्यात ४-३ अशी आघाडी केली. त्यानंतर मात्र भारतीय खेळाडूंनी भक्कम बचाव करत दक्षिण आफ्रिकेचे आक्रमण थोपवले आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.