निवृत्त होणार ‘भारताची भिंत’; पॅरिस ऑलिम्पिक : हॉकी गोलरक्षक श्रीजेशने केले जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 05:33 AM2024-07-23T05:33:27+5:302024-07-23T05:33:40+5:30

भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करताना कांस्यपदकाच्या रुपाने ४१ वर्षांनी ऑलिम्पिक पदक जिंकले होते.

'Wall of India' to retire; Paris Olympics: Hockey goalkeeper Sreejesh announced | निवृत्त होणार ‘भारताची भिंत’; पॅरिस ऑलिम्पिक : हॉकी गोलरक्षक श्रीजेशने केले जाहीर

निवृत्त होणार ‘भारताची भिंत’; पॅरिस ऑलिम्पिक : हॉकी गोलरक्षक श्रीजेशने केले जाहीर

पॅरिस : आगामी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा भारतीय हॉकीप्रेमींसाठी भावनिक ठरणार आहे. ‘यंदाची ऑलिम्पिक माझी अखेरची स्पर्धा ठरणार असून, या स्पर्धेनंतर मी निवृत्त होणार आहे,’ अशी घोषणा भारताचा दिग्गज गोलरक्षक पी. आर. श्रीजेश याने केली. भारताकडून ३२८ सामने खेळलेल्या श्रीजेशची ही चौथी ऑलिम्पिक स्पर्धा ठरेल. त्याचप्रमाणे, श्रीजेशने अनेक राष्ट्रकुल, आशियाई क्रीडा स्पर्धांसह अनेक विश्वचषक स्पर्धांतही आपली छाप पाडली आहे.

भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करताना कांस्यपदकाच्या रुपाने ४१ वर्षांनी ऑलिम्पिक पदक जिंकले होते. यामध्ये श्रीजेशची भूमिका मोलाची ठरली होती. हॉकी इंडियानेही सोमवारी श्रीजेशला त्याच्या शानदार कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे हॉकी इंडियाने भारतीय संघासाठी ‘विन इट फॉर श्रीजेश’ (श्रीजेशसाठी जिंका) अशी मोहीमही सुरू केली आहे. यामुळे भारतीय खेळाडूंना पदक जिंकण्याची प्रेरणा मिळेल, असे हॉकी इंडियाने म्हटले.

श्रीजेशची कामगिरी
  २०१० मध्ये श्रीजेशने भारताकडून पदार्पण केले.
  २०१४ आशियाई स्पर्धेत सुवर्ण, २०१८ आशियाई स्पर्धेत कांस्य विजेत्या भारतीय संघाचा सदस्य.
  २०१८ आशियाई 
चॅम्पियन्स ट्रॉफी संयुक्त विजेता, २०१९ एफआयएच पुरुष सिरीज फायनल सुवर्णपदक आणि २०२२ राष्ट्रकुल रौप्यपदक विजेत्या भारतीय संघाचा सदस्य.
  २०२१-२२ एफआयएच हॉकी प्रो-लीग स्पर्धेत भारताला तिसऱ्या स्थानी पोहोचवण्यात श्रीजेशची निर्णायक भूमिका.

पुरस्कार
  २०२१ साली मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित.
  २०२१ साली वर्ल्ड गेम्स ॲथलिट ऑफ द इयर पुरस्कार जिंकणारा केवळ दुसरा भारतीय ठरला.
  २०२१ आणि २०२२ अशी सलग दोन वर्षे एफआयएच वर्षातील सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार पटकावला.

 मला माझ्या कारकिर्दीवर खूप गर्व आहे. माझा  प्रवास विशेष ठरला. कुटुंबीय, सहकारी, प्रशिक्षक, प्रशंसक आणि हॉकी इंडियाकडून मिळालेले प्रेम आणि समर्थनासाठी आभारी राहीन. - पी. आर. श्रीजेश

Web Title: 'Wall of India' to retire; Paris Olympics: Hockey goalkeeper Sreejesh announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Hockeyहॉकी