पुरूषांच्या तुलनेत महिलांना मिळते दुय्यम वागणूक! यानेक शॉपमन यांचा हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 06:03 AM2024-02-25T06:03:28+5:302024-02-25T06:03:36+5:30
नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षक यानेक शॉपमन यांनी हॉकी इंडियाकडून दुय्यम वागणूक दिली जात असल्याच्या ...
नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षक यानेक शॉपमन यांनी हॉकी इंडियाकडून दुय्यम वागणूक दिली जात असल्याच्या निषेधार्थ अखेर पदाचा राजीनामा दिला. भारतात पुरुष संघाच्या तुलनेत महिला हॉकी संघाला सन्मान मिळत नसल्याचे त्यांचे मत आहे.
हॉलंडच्या शॉपमन यांनी २०२१ ला सोर्ड मारीन यांचे स्थान घेतले होते. शॉपमन यांचा करार यंदा पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत होता. त्यांनी हॉकी इंडियावर थेट नेम साधल्यामुळे त्या पदावर कायम राहतील, असे वाटत नव्हते. ४६ वर्षांच्या शॉपमन यांनी ओडिशातील एफआयएच प्रो लीगचे स्थानिक सत्र आटोपल्यानंतर हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांना आपला राजीनामा सोपविला.
या हालचालींवर हॉकी इंडियाचे मत असे की, अलीकडच्या निराशादायी कामगिरीनंतर शॉपमन यांच्या राजीनाम्याने नव्या मुख्य कोचच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला. २०२६ चा महिला विश्वचषक आणि २०२९ च्या लॉस एंजिलिस ऑलिम्पिकसाठी संघबांधणी करायची असून, कोचची प्रतीक्षा आहे. भारतीय महिला हॉकीचा नवा अध्याय सुरू करण्याची हीच वेळ असून, खेळाडूंच्या प्रगतीवर फोकस करीत आहोत.’’ शॉपमन यांनी माध्यमांशी संवाद साधताना दावा केला होता की, ‘हॉकी इंडिया पुरुष संघाच्या तुलनेत महिला संघाला दुय्यम वागणूक देते. महिला खेळाडूंचा सन्मान होत नाही. मागच्या दोन वर्षांत मी स्वत:ला एकाकी मानले. मी अशा संस्कृतीतून आले, जेथे महिलांचा सन्मान होतो. त्यांना महत्त्व दिले जाते. भारतात मला असे काहीच जाणवत नाही.’ हॉकी इंडियाने मात्र शॉपमन यांच्या या दाव्याचा इन्कार केला.
शाॅपमन यांची उपलब्धी....
भारतीय महिला हॉकी संघाने यानेक शॉपमन यांच्या मार्गदर्शनात ७४ पैकी ३८ सामने जिंकले. १७ सामने अनिर्णीत राहिले तर १९ सामन्यांत पराभव पत्करावा लागला. २०२२ ला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य, २०२२ च्या आशियाई स्पर्धेत कांस्य आणि मस्कत आशिया चषकात कांस्य पदक जिंकल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनात २०२३ ला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद पटकाविले. पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता मात्र गाठता आलेली नाही.