महिला हॉकी; भारतीय संघाचा यजमान दक्षिण कोरियावर विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 02:02 AM2018-03-06T02:02:47+5:302018-03-06T02:02:47+5:30
भारतीय महिला हॉकी संघाने पाच सामन्यांच्या मालिकेची सकारात्मक सुरुवात करताना सोमवारी दक्षिण कोरियाचा सलामीच्या लढतीत १-० ने पराभव केला. भारताच्या लालरेमसियामीने (पाचवा मिनिट) नोंदवलेला गोल सामन्यात निर्णायक ठरला. भारताच्या संरक्षक फळीने शानदार कामगिरी करीत मनोधैर्य उंचावणारा विजय नोंदवला.
सेऊल - भारतीय महिला हॉकी संघाने पाच सामन्यांच्या मालिकेची सकारात्मक सुरुवात करताना सोमवारी दक्षिण कोरियाचा सलामीच्या लढतीत १-० ने पराभव केला. भारताच्या लालरेमसियामीने (पाचवा मिनिट) नोंदवलेला गोल सामन्यात निर्णायक ठरला. भारताच्या संरक्षक फळीने शानदार कामगिरी करीत मनोधैर्य उंचावणारा विजय नोंदवला.
भारतीय संघ सुरुवातीपासून सकारात्मक भासला. पाचव्या मिनिटाला त्याचा संघाला लाभ मिळाला. लालरेमसियामीने गोलकिपर मिजिन हानला हुलकावणी देत चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविला.
भारतीय संघाने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलक्षेत्रात वारंवार मुसंडी मारत वर्चस्व गाजवले. त्याचसोबत बचाव अभेद्य राखला.
दुसºया क्वार्टरमध्ये १८ व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण मिजिन हानने यावेळी चांगला बचाव केला. तीन मिनिटांनंतर कोरियाच्या गोलकिपरने पेनल्टी कॉर्नरवर चांगला बचाव केला. २३ व्या मिनिटाला भारताने एक पेनल्टी कॉर्नर गमावला, पण पदार्पणाची लढत खेळणारी गोलकिपर स्वातीने चांगला बचाव करीत संघाची आघाडी कायम राखली. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेला कोरियन संघ बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील होता, पण भारताने बचाव अभेद्य राखत यजमान संघाला कुठली संधी दिली नाही.
चौथ्या क्वार्टरमध्ये स्वातीने भारताची आघाडी कायम राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तिने अखेरच्या क्वार्टरमध्ये सहा मिनिटांत दोन पेनल्टी कॉर्नर रोखलेम् तर ५० व्या मिनिटाला एक पेनल्टी स्ट्रोकही रोखला. भारताला त्यानंतर आणखी दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण द. कोरियाने भक्कम बचाव करीत भारताचे प्रयत्न हाणून पाडले.
भारतीय कर्णधार राणी रामपालने आज या सामन्याच्या निमित्ताने आपले आंतरराष्ट्रीय सामन्यांचे द्विशतक पूर्ण केले तर मोनिकाची ही १०० वी लढत होती. भारतीय संघ आज, मंगळवारी मालिकेतील दुसरी लढत खेळणार आहे.