Women's Hockey World Cup : पहिला विजय अन् भारत थेट उपांत्यपूर्व फेरीत
By स्वदेश घाणेकर | Published: August 1, 2018 09:42 AM2018-08-01T09:42:37+5:302018-08-01T16:50:21+5:30
विश्वचषक महिला हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने मंगळवारी इटलीला 3-0 असा नमवण्याचा पराक्रम केला. जागतिक क्रमवारीचा विचार करता या लढतीत भारतीय महिलांचा विजय अपेक्षितच होता.
लंडन - विश्वचषक महिला हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने मंगळवारी इटलीला 3-0 असा नमवण्याचा पराक्रम केला. जागतिक क्रमवारीचा विचार करता या लढतीत भारतीय महिलांचा विजय अपेक्षितच होता. परंतु, इटलीने साखळी गटात कोरिया आणि चीन यांना पराभूत केल्यामुळे भारतीय चमूत थोडी धाकधुक होतीच. मात्र त्या भितीने डोकं वर काढण्यापूर्वीच भारतीय महिलांनी इटलीवर विजय मिळवला. विशेष म्हणजे भारताने स्पर्धेत एकमेव विजय मिळवून थेट उपांत्यपूर्व फेरीचे तिकिट पटकावले आणि यंदाच्या विश्वचषक ऑस्ट्रेलियापाठोपाठ अशी कामगिरी करणारा तो दुसरा संघ ठरला आहे.
2017च्या आशिया चषक विजयानंतर आणि 2018च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदकानंतर भारताच्या या संघाकडून अपेक्षा उंचावणे साहजिकच होते. कर्णधार राणी रामपाल आणि अनुभवी गोलरक्षक सविता पुनिया या जोडीने आपल्या कामगिरीने सहका-यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. त्याचेच फलित आशियातील स्पर्धांमध्ये मिळाले. हॉकी इंडियाकडून सापत्न वागणूक मिळत असली तरी त्याचा वाच्छता न करता या खेळाडू लक्ष्याच्या दिशेने चालत राहिल्या. या मार्गात ते अडथळल्या, पण थांबल्या नाहीत. इटलीविरूद्धच्या विजयासह भारतीय महिलांनी या सामन्यात अनेक विक्रम केले आहेत.
FT| The Indian Women's Team claim their place in the Quarter Finals of the Vitality Hockey Women's World Cup London 2018 after an assured overall performance against Italy on 31st July 2018.#IndiaKaGame#HWC2018#INDvITApic.twitter.com/rThXKEuuKg
— Hockey India (@TheHockeyIndia) July 31, 2018
भारतीय महिलांनी या विजयासह आणखी अनेक विक्रम केला.7 वर्ष 10 महिने आणि 21 दिवसांनंतर भारताने विश्वचषक स्पर्धेत विजयाची चव चाखली. याआधी 10 सप्टेंबर 2010 मध्ये भारताने विश्वचषक स्पर्धेत अखेरचा विजय मिळवला होता. भारताने त्या स्पर्धेत 9/10 स्थानासाठी झालेल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेवर 4-3 असा विजय मिळवला होता आणि त्या लढतीत राणी रामपालने दोन गोल केले होते. त्यामुळे 2881 दिवसांनी भारताने विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवला. 411 आठवडे व 4 दिवस भारतीय महिलांची या स्पर्धेतील विजयाची पाटी कोरीच होती. भारताला उपांत्यपूर्व फेरीत आयर्लंडचा सामना करावा लागणार आहे.
विश्वचषक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरी ही मोठी मजल नक्कीच नाही. पण, त्याकडे दुर्लक्ष करून नक्की चालणार नाही. एक तर 2010 नंतर भारतीय महिला विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरल्या. त्यात अव्वल आठमध्ये प्रवेश करणे ही सोपी गोष्ट नक्कीच नाही. जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानावर असलेल्या दुस-या स्थानावर असलेला इंग्लंड आणि सातव्या स्थानावर असलेला अमेरिका असे तुलनेने बलाढ्य संघ गटात असताना भारतीय खेळाडू डगमगले नाहीत हे विशेष. सलामीच्या लढतीत भारताने यजमान इंग्लंडला अखेरपर्यंत तलवारीच्या टोकावर ठेवले होते. मात्र त्यांनी 53व्या मिनिटाला गोल करून त्यांनी हा सामना 1-1 असा बरोबरीत सोडवला.
दुस-या लढतीत त्यांना आयर्लंडकडून हार पत्करावी लागली, तर निर्णायक सामन्यात अमेरिकेविरूद्ध 0-1 अशा पिछाडीवर असताना कर्णधार राणी रामपालच्या सुरेख गोलच्या जोरावर 1-1 अशी बरोबरी साधली. या लढतीच्या तिस-याच मिनिटाला राणीला पाय मुरगळल्यामुळे मैदान सोडावे लागले, परंतु संघ संकटात असलेला पाहून ती मध्यंतरानंतर परतली आणि संघाला तारलेही. भारताने (-1) B गटातील तिस-या स्थानासाठी अमेरिकेवर (-2) गोल सरासरीने मात केली. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीसाठीच्या क्रॉस ओव्हर लढतीसाठी संघ पात्र ठरला. त्यात त्यांनी इटलीवर विजय मिळवला आणि स्पर्धेत एकमेव विजय मिळवून भारताने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
सामन्याची तारीख ः 2 ऑगस्ट
सामन्याची वेळ - रात्री 10.30 वाजता
थेट प्रक्षेपण - स्टार स्पोर्ट्स 2 व हॉटस्टार