Women's Hockey World Cup: 'सावत्र' महिला संघाकडून कसा होईल 'चक दे'सारखा चमत्कार?

By स्वदेश घाणेकर | Published: July 19, 2018 03:34 PM2018-07-19T15:34:44+5:302018-07-19T15:35:11+5:30

भारतीय महिला हॉकी संघाचा वैभवशाली इतिहास लंडनच्या एका म्युझिअममध्ये छायाचित्रांच्या स्वरूपात मांडण्यात आलाय म्हणे. निमित्त शनिवारपासून सुरू होत असलेली महिलांची विश्वचषक हॉकी स्पर्धा.

Women's Hockey World Cup: How will the women's hockey team do miracle? | Women's Hockey World Cup: 'सावत्र' महिला संघाकडून कसा होईल 'चक दे'सारखा चमत्कार?

Women's Hockey World Cup: 'सावत्र' महिला संघाकडून कसा होईल 'चक दे'सारखा चमत्कार?

Next

भारतीय महिला हॉकी संघाचा वैभवशाली इतिहास लंडनच्या एका म्युझिअममध्ये छायाचित्रांच्या स्वरूपात मांडण्यात आलाय म्हणे. निमित्त शनिवारपासून सुरू होत असलेली महिलांची विश्वचषक हॉकी स्पर्धा. या महासंग्रामात उतरण्यापूर्वी भारतीय महिला या म्युझिअमला नक्की भेट देतील. आता, भारतीय महिलांच्या हॉकीतील कामगिरीला वैभवशाली म्हणावं की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जाऊ शकते. १९७४ च्या पहिल्याच विश्वचषक स्पर्धेत चौथे स्थान ही आपली आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी. १९८२ मध्ये आशियाई, २००२ मध्ये राष्ट्रकुल, २००४ मधील आशिया चषक,२०१६ मध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील जेतेपद हा महिला संघाचा इतिहास. २०१७ मध्ये म्हणजेच १३ वर्षांनी या महिलांनी आशिया चषक पुन्हा उंचावला. या पलीकडे महिला हॉकीपटूंकडे सांगण्यासारखी एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे त्यांचा संघर्ष. तो तेव्हाही होता आणि आत्तापर्यंत सुरूच आहे. त्या संघर्षाची व्याप्ती आकुंचन पावतेय, पण अगदीच संथगतीने.
भारताच्या महिला हॉकी संघाकडे नेहमी दुय्यम नजरेने पाहिले गेले. प्रशिक्षकांची निवड, मूलभूत सोयी सुविधा, सराव स्पर्धा, परदेश दौरे, यासाठी त्यांना नेहमी झगडावे लागले. आज परिस्थिती तशी नाही. पण ती पूर्वीपेक्षा फार चांगली आहे असंही नाही. त्यांच्या वाट्याला कायमच सापत्न वागणूक आली आहे. अगदी २०१५ पर्यंत भारतीय महिला संघाला कुणी वाली आहे का? हा प्रश्न सतत मनात येत होता. १९८० नंतर भारतीय हॉकी संघाने प्रथमच ऑलिंपिक स्पर्धेची पात्रता मिळवली. ३६ वर्षांनी भारतीय संघ दुसऱ्यादा ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी झाला. महिला हॉकीसाठी ती नवी पहाटच होती. पण म्हणून त्यांना लगेच भारतीय पुरुष हॉकी  संघाच्या समांतर बसवले गेले नाही.  ना प्रशिक्षक निवड प्रक्रियेत मत मांडण्याचे अधिकार, ना परदेश दौरा आयोजित करण्याचा मागणी अधिकार.. हॉकी इंडियाने दिलेल्या प्रशिक्षकासोबत हॉकीचा सराव करायचा आणि ते ठरवतील त्या दौऱ्यावर जायचे, हे चालत आले आहे. पुरुष संघाचे प्रशिक्षक वर्षावर्षाला बदलल्याची उदाहरण आहेत, पण तशी तत्परता, सजगता महिला संघाचा प्रशिक्षक निवडताना दाखवली जात नाही. आताही तेच झाले आहे.  
रोलँट ओल्टमन्स यांची उचलबांगडी झाली आणि महिला संघाचे प्रशिक्षक शोर्ड मरिन्झ यांना पुरूष संघ सांभाळण्यास सांगितले. ज्युनियर संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांची महिला संघाच्या उच्च कामगिरी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. मरिन्झ यांच्या मार्गदर्शनाखाली पुरुष संघाला साजेशी कामगिरी करता न आल्याने पुन्हा खांदेपालट. मरिन्झ निष्क्रिय होते मग महिला संघाच्या प्रशिक्षकांची जबाबदारी त्यांना पुन्हा का दिली? पुरुष संघाच्या कामगिरीतून मिळणारा महसूल अधिक म्हणून त्यांना रॉयल ट्रिटमेंट अन् महिला संघाला अगदी उलट वागणूक. रिओ ऑलिंपिकनंतर परिस्थितीत फार नाही, पण बदल झाला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम हा २०१७ च्या आशियाई स्पर्धेत दिसला. १३ वर्षांनी महिलांनी ही स्पर्धा जिंकली. २०१८ च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर राष्ट्रकुल स्पर्धेत महिला संघ पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आला. म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. पण, दोन वर्षांत संघ घडत नाही. 
वस्तुस्थिती लक्षात घेता, भारतीय संघाने साखळी फेरीचा अडथळा पार केला, तरी ते मोठे यश ठरू शकते. जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाला ब गटात क्रमवारीत त्यांच्यापेक्षा पुढे असलेल्या यजमान इंग्लंड ( 2) आणि अमेरिका ( 7) यांचा सामना करावा लागणार आहे. या स्पर्धेत निवडलेल्या भारताच्या 18 खेळाडूंमध्ये 16 खेळाडू प्रथमच विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहेत. असं असतानाही, संघ चांगली कामगिरी करेल असा विश्वास कर्णधार राणी रामपालने व्यक्त केला आहे. पण, आत्तातरी विश्वचषक जिंकण्याचे दिवास्वप्नच भारतीय संघ पाहत आहे, असे म्हटल्यास वावग ठरणार नाही. 


Web Title: Women's Hockey World Cup: How will the women's hockey team do miracle?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.