महिला हॉकी विश्वकप : भारताची लढत इटलीसोबत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 04:42 AM2018-07-31T04:42:02+5:302018-07-31T04:42:17+5:30
अमेरिकेच्या बलाढ्य संघाला बरोबरीत रोखत आशा कायम राखणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाला मंगळवारी बाद फेरीत कमी रँकिंग असलेल्या इटलीसोबत लढत द्यावी लागेल.
लंडन : अमेरिकेच्या बलाढ्य संघाला बरोबरीत रोखत आशा कायम राखणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाला मंगळवारी बाद फेरीत कमी रँकिंग असलेल्या इटलीसोबत लढत द्यावी लागेल.
जागतिक क्रमवारीत १० व्या स्थानावर असलेला भारतीय संघ क्रमवारीत १७ व्या क्रमांकावर असलेल्या इटली संघाविरुद्ध बाद फेरीत विजयाचा दावेदार मानला जात आहे. या सामन्यात विजय मिळवला तर भारताचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित होईल. अनुकूल निकाल मिळाला तर गुरुवारी क्वार्टर फायनलमध्ये भारताची गाठ आयर्लंडविरुद्ध पडेल.
‘ब’ गटात भारताची वाटचाल सोपी नव्हती. भारताने इंग्लंड व अमेरिका या संघांविरुद्ध सामने अनिर्णीत राखले तर आयर्लंडविरुद्ध त्यांना पराभव स्वीकारावा लागला. दुसºया बाजूचा विचार करता इटलीने चीन (३-०) आणि कोरिया (१-०) या संघांचा पराभव केला तर नेदरलँडविरुद्ध अखेरच्या लीग सामन्यात त्यांना १-१२ ने लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. दोन विजयांसह इटली संघ ‘अ’ गटात दुसºया स्थानी राहिला.
मंगळवारच्या लढतीत भारतीय संघाचे पारडे वरचढ राहण्याची शक्यता आहे. इटलीसाठी नेदरलँडविरुद्धचा पराभव मनोधैर्य ढासळविणारा आहे. त्यामुळे त्यांना पुनरागमन करणे सोपे जाणार नाही.
भारतीय संघाने दडपणाखाली अमेरिका संघाविरुद्ध प्रभावी खेळ केला आणि सामना अनिर्णीत राखत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले.
अमेरिका संघाने ११ व्या मिनिटाला आघाडी घेतली होती, पण कर्णधार राणी रामपालने ३१ व्या मिनिटाला भारताला बरोबरी साधून दिली. त्यामुळे अमेरिका संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
भारतीय संघ जर मंगळवारी विजय मिळवण्यात यशस्वी ठरला तर राणी रामपालच्या नेतृत्वाखालील संघाला साखळी फेरीत आयर्लंडविरुद्ध ०-१ ने पत्कराव्या लागलेल्या पराभवाचा हिशेब चुकता करण्याची संधी राहील.
भारतीय कर्णधार राणीने मात्र नेदरलँडविरुद्ध इटलीच्या १-१२ ने पराभवानंतरही संघाला आत्ममश्गुल न राहण्याचा सल्ला दिला आहे. कारण इटली संघाचा दावेदारांमध्ये समावेश आहे.
भारतीय संघ याव्यतिरिक्त हॉकी विश्वकप सेमीफायनल २०१५ मध्ये इटली संघाविरुद्ध शूटआऊटमध्ये मिळवलेल्या विजयापासून प्रेरणा घेण्यासाठी प्रयत्नशील राहील.
राणी म्हणाली,‘इटली संघ दर्जेदार असून त्यांनी या स्पर्धेत चांगला खेळ केला आहे. पण, आम्ही त्यांना पराभूत करू शकतो, या आत्मविश्वासानेच मंगळवारच्या लढतीत खेळावे लागेल.’
सामन्याची वेळ : भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजतापासून