महिला हॉकी विश्वचषक : भारतासाठी ‘करा किंवा मरा’ स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 05:28 AM2018-07-29T05:28:15+5:302018-07-29T05:28:31+5:30
आपल्यापेक्षा कमी रँकिंग असलेल्या आयर्लंडकडून पराभवाचा धक्का बसलेल्या भारतीय महिला संघासाठी विश्वचषकाच्या बाद फेरीत पोहोचण्यासाठी ‘ब’ गटात आज रविवारी ‘करा किंवा मरा’ लढतीत अमेरिकेवर विजय नोंदविणे अत्यावश्यक झाले आहे.
लंडन : आपल्यापेक्षा कमी रँकिंग असलेल्या आयर्लंडकडून पराभवाचा धक्का बसलेल्या भारतीय महिला संघासाठी विश्वचषकाच्या बाद फेरीत पोहोचण्यासाठी ‘ब’ गटात आज रविवारी ‘करा किंवा मरा’ लढतीत अमेरिकेवर विजय नोंदविणे अत्यावश्यक झाले आहे.
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडविरुद्ध प्रारंभी आघाडी घेऊनही सामना बरोबरीत सुटल्यामुळे राणी रामपालच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला आयर्लंडने १-० ने पराभूत केले. यामुळे भारताच्या थेट उपांत्यपूर्व फेरीच्या आशा क्षीण झाल्या.
चार गटातील अव्वल चार संघ थेट उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार असून उर्वरित चार स्थाने क्रॉसओव्हर पद्धतीने भरण्यात येतील. आपापल्या गटात दुसºया आणि तिसºया स्थानावर राहणारे संघ क्रॉसओव्हर फेरीत एकमेकांविरुद्ध खेळणार असून, पहिल्या चार स्थानावर राहणारे संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल होणार आहेत. भारतीय संघ ब गटात सध्या तिसºया स्थानावर आहे. अमेरिकादेखील तिसºया स्थानावर असला तरी, भारतीय संघ गोलफरकात पुढे आहे.
उपांत्यपूर्व फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला अमेरिकेवर विजय हवा आहे. विजय मिळाला नाही तर किमान सामना बरोबरीत सोडविणे गरजेचे असेल. मुख्य कोच शोर्ड मारिन म्हणाले, ‘अमेरिकेवर विजय नोंदविणे आमच्यासाठी क्रमप्राप्त झाले, यात काही शंका नाही.’ भारताला इंग्लंडविरुद्ध एकही पेनल्टी कॉर्नर मिळाला नव्हता.