विश्वचषक महिला हॉकी : भारताने विजयाची संधी गमावली; अखेरच्या क्षणी इंग्लंडने साधली बरोबरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 01:58 AM2018-07-22T01:58:32+5:302018-07-22T01:59:09+5:30
अखेरच्या काही मिनिटांमध्ये बचाव फळीतील ढिसाळपणा भारताला भोवला.
लंडन : अखेरच्या काही मिनिटांमध्ये बचाव फळीतील ढिसाळपणा भारताला भोवला. ५३ व्या मिनिटाला इंग्लंडची स्ट्रायकर लिली ओसले हिने बचावफळी भेदत गोल केला आणि सामन्यात बरोबरी साधली.
विश्व चषक महिला हॉकी स्पर्धेत भारताने आॅलिम्पिक चॅम्पियन इंग्लंडच्या संघाविरोधात पहिला गोल २५ व्या मिनिटालाच केला. नेहा गोयल हिने मैदानी गोल करत ही आघाडी घेतली. विश्व रँकिंगमध्ये दहाव्या स्थानावर असलेल्या भारताने इंग्लंड विरोधात आक्रमक सुरुवात केली. त्याचा फायदादेखील भारताला मिळाला.
तिसऱ्या क्वार्टरपर्यंत ही आघाडी कायम होती. मात्र अखेरच्या क्वार्टरमध्ये इंग्लंडच्या संघाने सातत्याने भारताच्या गोलपोस्टवर हल्ले केले. त्याचा फायदा घेत ५३ व्या मिनिटाला लिली ओसले हिने भारताच्या बचाव फळीचा चकवत गोल केला. पहिल्या दोन सत्रात भारताने तांत्रिकदृष्ट्या सक्षम खेळ केला. मध्यंतरानंतर भारताने त्याच जोशात खेळ पुढे नेला. भारतीय खेळाडूंनी सातत्याने आक्रमण केले. इंग्लंडनेही पलटवार केला.
इंग्लंडच्या आक्रमक खेळामुळे भारताची बचावफळी काहीशी भांबावली. त्याचा फायदा इंग्लंडने घेतला. टोकियो आॅलिम्पिक स्पर्धेच्या पात्रतेचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन खेळ करताना भारतीय खेळाडूंनी पंधरा मिनिटांच्या पहिल्या सत्रात इंग्लंडच्या प्रत्येक खेळाडूला मार्किंगचा डाव खेळला. भारताचा पुढचा सामना २६ रोजी आयर्लंडसोबत होणार आहे.
नमिता टोप्पोचा १५० वा आंतरराष्ट्रीय सामना
भारताची मध्यरक्षक नमिता टोप्पो हिने देशासाठी आज १५० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. ओडिशाच्या या २३ वर्षांच्या खेळाडूने २०१२ मध्ये डब्लिनमध्ये चॅम्पियन्स चॅलेंज स्पर्धेत वरिष्ठ संघात पदार्पण केले होते. देशासाठी १५० वा सामना खेळल्याबद्दल हॉकी इंडियाने तिचे अभिनंदन केले आहे.