विश्व हॉकी लीग फायनल भारत जर्मनीकडून पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 05:13 AM2017-12-05T05:13:33+5:302017-12-05T05:13:47+5:30
वेगवान सुरुवात करणारा भारतीय संघ विश्व हॉकी लीग फायनलच्या अखेरच्या साखळी सामन्यात सोमवारी जर्मनीकडून मात्र ०-२ ने पराभूत झाला
भुवनेश्वर: वेगवान सुरुवात करणारा भारतीय संघ विश्व हॉकी लीग फायनलच्या अखेरच्या साखळी सामन्यात सोमवारी जर्मनीकडून मात्र ०-२ ने पराभूत झाला. कलिंगा स्टेडियमवर जर्मनीकडून हेनर मार्टिनने १७ व्या तसेच मॅट्स ग्रॅमबुशने २० व्या मिनिटाला गोल केले.
आॅस्ट्रेलियाला १-१ असे बरोबरीत रोखल्यानंतर इंग्लंडकडून भारतीय संघ २-३ ने पराभूत झाला. त्यामुळे दोन पराभव पत्करणाºया भारतीय संघाला केवळ एका गुणाची कमाई होऊ शकली. या विजयासोबत जर्मनी संघ ‘ब’ गटात अव्वल स्थानावर आला. जर्मनीची बचावफळी भक्कम मानली जाते. आज ही बाब पुन्हा एकदा सिद्ध झाली. जर्मनीच्या खेळाडूंनी भारताचे हल्ले वारंवार थोपवून लावले शिवाय भारतीय बचाव फळीला अनेकदा चकविले. पाहुण्या खेळाडूंना मोजक्याच संधी मिळाल्या तरीही त्यांनी पुरेपूर लाभ घेत मध्यंतरापर्यंतच्या खेळात २-० अशी आघाडी मिळविली होती. जर्मनीने पहिला गोल पेनल्टी कॉर्नरवर केला. कर्णधार मार्टिन हेनर याने दुसºया क्वार्टरच्या सुरुवातीला गोलकिपर आकाश चिकटे याच्या उजवीकडून चेंडू काढून शानदार गोल केला. दोन मिनिटानंतर मॅट्सने भारतीय बचावफळी भेदून डीमध्ये स्थान मिळविले. त्याने मारलेला चेंडू विरेंद्र लाक्राच्या स्टीकला लागून गोलजाळीत विसावला. दुसरा गोल होताच भारतीय चाहत्यांमध्ये निराशा परसली. मैदानावर सर्वत्र शुकशुकाट सुरू झाला. त्यानंतर भारताने पाठोपाठ हल्ले चढविले पण गोलजाळीच्या जवळ येताच फिनिशिंगमध्ये भारतीय संघ कमी पडला.
मनदीपसिंगचा शानदार प्रयत्न जर्मनीच्या गोलकिपरने हाणून पाडताच अखेरची आशा देखील संपुष्टात आली. सामन्याअखेरीस भारताने हल्ले वाढविले पण प्रतिस्पर्धी संघाच्या गोलफळीपर्यंत पोहोचण्यात आक्रमक फळी अपयशी ठरली.(वृत्तसंस्था)