विश्व हॉकी लीग फायनल्स; भारताच्या अंतिम संघाची घोषणा, सरदार सिंग संघाबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:42 AM2017-11-18T00:42:31+5:302017-11-18T00:42:42+5:30
पुढच्या महिन्यात भुवनेश्वरमध्ये होणाºया हॉकी विश्व लीग फायनल्ससाठी भारताच्या १८ सदस्यांच्या संघाची घोषणा करण्यात आली.
नवी दिल्ली : पुढच्या महिन्यात भुवनेश्वरमध्ये होणाºया हॉकी विश्व लीग फायनल्ससाठी भारताच्या १८ सदस्यांच्या संघाची घोषणा करण्यात आली. त्यातून अनुभवी मिडफिल्डर सरदार सिंगला वगळण्यात आले आहे. त्याचवेळी रूपिंदर सिंग आणि वीरेंद्र लाकडा हे पुनरागमन करत आहेत.
या वर्षी खेलरत्न पुरस्कार मिळवणाºया सरदारला वगळले जाणे हे धक्कादायक आहे. गेल्या महिन्यात आशिया चषक विजेत्या भारतीय संघाचा तो सदस्य होता. माजी कर्णधाराच्या करिअरचा अंत म्हणून याकडे पाहिले जात आहे. आशिया चषकात सरदारने मिडफिल्डमध्ये प्लेमेकरची भूमिका बजावण्याऐवजी युवा कर्णधार मनप्रीत सिंगसोबत डिफेंडर म्हणून खेळ केला होता. हॉकी विश्व लीगमधून त्याला बाहेर करणे म्हणजे तो नवीन प्रशिक्षक शोर्ड मरिन यांच्या रणनीतीत फिट बसत नाही. मरिन यांनी आशिया चषकाच्या आधी रोलेंट ओल्टमन्स यांना बाहेर केल्यानंतर संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले होते.
रूपिंदरने भारतासाठी या आधीचा सामना हॉकी विश्व लीग सेमीफायनल्समध्ये युरोप दौºयात खेळला होता, तर लाकडा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी संघाचा भाग होता.
हॉकी इंडियाच्या निवडकर्त्यांनी मनप्रीत सिंग याला कर्णधार म्हणून कायम ठेवले आहे. तर चिंगलेनसाना सिंग उपकर्णधार असेल. पी.आर.श्रीजेश अजून पूर्णपणे फिट नसल्याने गोलरक्षकाची जबाबदारी आकाश चिकटे आणि सूरज करकेरावर असेल. मिडफिल्डमध्ये एस.के.उथप्पा, कोथाजित सिंह आणि सुमितसोबत मनप्रीत आणि चिंगलेनसाना असेल.
ज्युनियर विश्वचषकाचे स्टार हरमनप्रीत सिंग, वरुण आणि दिप्सन तिर्की यांनी युरोप आणि आशिया चषकात केलेल्या दमदार कामगिरीचे फळ मिळाले आहे. ओडिशाच्या अमित रोहिदास याने पुनरागमन केले. भारताकडे एस.व्ही. सुनील, आकाशदीप सिंग, गुरजंत सिंग यांच्यासारखे अनुभवी फॉरवर्ड आहे. ललित उपाध्याय आणि मनदीप सिंग यांनी आशिया चषकातून बाहेर राहिल्यानंतर संघात पुनरागमन केले.
कारकिर्दीला नव्याने सुरूवात करणार - रुपिंदर
गेल्या सहा महिन्यांपासून हॉकी संघातून बाहेर असलेल्या रुपिंदरपाल याला हॉकी विश्वलीग फायनल्ससाठी संघात स्थान मिळाले आहे. पुुनरागमनाच्या या संधी आपण सोने करु तसेच कारकिर्दीलाच नव्याने सुरूवात करण्याचा निर्धार रुपिंदरपाल याने व्यक्त केला.
रुपिंदरने सांगितले की,‘ मला शंका होती की मी पुनरागमन करु शकतो की नाही. मी त्यासाठी खुप मेहनत घेतली. माझे पहिले लक्ष्य होते. आशिया कपमधून पुनरागमन करण्याचे मात्र मी त्यासाठी घाई केली नाही. मी दिल्ली आणि बंगळुरूच्या साई सेंटरमध्ये मानसीक तणावातून बाहेर पडलो.‘
हॉकी संघ पुढीलप्रमाणे
गोलकिपर - आकाश चिकटे, सूरज करकेरा.
डिफेंडर - हरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, दिप्सन तिर्की, वरुण कुमार, रूपिंदरपाल सिंग, वीरेंद्र लाकडा.
मिडफिल्डर - मनप्रीत सिंग (कर्णधार), चिंगलेनसाना सिंग, एस.के.उथप्पा, सुमित, कोथाजित सिंग.
फॉरवर्ड - एस.व्ही.सुनील, आकाशदीप सिंग, मनदीप सिंग, ललित उपाध्याय, गुरजंत सिंग.
भुवनेश्वरमध्ये पुनरागमन आनंददायी - वीरेंद्र लाकडा
सुमारे वर्षभरानंतर भारतीय संघात परतणाºया अनुभवी डिफेंडर वीरेंद्र लाकडा याच्या पुनरागमनचा आनंद दुप्पट झाला आहे. कारण तो त्याच्या होमटाऊनमध्ये म्हणजेच भुवनेश्वरमध्येच भारतीय संघात पुरागमन करत आहे. ही बाब आपल्यासाठी ‘सोने पे सुहागा’ अशीच असल्याचे लाकडा याने सांगितले. पुनरागमनाच्या बाबतीत लाकडा याने जर्मन हॉकीपटू मोरित्ज फुएर्स्ते याच्याकडून प्रेरणा घेतली. लाकडा म्हणाला की, ‘मोरित्जच्या करिअरमध्ये फिटनेसच्या समस्या आल्या होत्या. त्याने पुन्हा दमदार पुनरागमन केले होते. मी त्यापासूनच प्रेरणा घेतली.’