जागतिक हॉकी लीग स्पर्धा 2017 – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना सुटला बरोबरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 10:08 PM2017-12-01T22:08:24+5:302017-12-01T22:17:50+5:30
भुवनेश्वर- ऑस्ट्रेलियाच्या टायलर लोवेलची उत्कृष्ट कामगिरी व भारताकडून आकाश चिकटे, सुरज करकेराच्या जोडगोळीनं केलेल्या चांगल्या खेळामुळे जागतिक हॉकी लीग स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 1-1 अशा बरोबरीत रोखलं.
भुवनेश्वर- भारतीय पुरुष हॉकी संघाने विश्व हॉकी लीगच्या अंतिम फेरीत सलामीला विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाला पराभूत करण्याची संधी शुक्रवारी गमावली. अत्यंत तडफदार खेळ केल्यानंतरही भारतीय खेळाडूंनी मोक्याच्या क्षणी संधी घालविल्यामुळे विजयाने हुलकावणी दिली. हा सामना १-१ ने बरोबरीत सुटला.
कलिंगा स्टेडियमवर विद्युत प्रकाशझोतात घरच्या प्रेक्षकांपुढे रंगलेला हा सामना अखेरच्या क्षणापर्यंत उत्कंठापूर्ण ठरला. भारताने या सामन्यावर बराचवेळ वर्चस्व गाजविले. चेंडू अधिकाधिक वेळ ताब्यात ठेवला. पण गोल नोंदविण्याची वेळ येताच चुका केल्यामुळे पाहुण्या संघावर आघाडी घेता आली नाही. सामन्यात २० व्या मिनिटाला भारताने पहिला गोल करीत आघाडी मिळविली. ड्रॅगफ्लिकर मनदीपसिंग याने हा गोल केला. तथापि भारतीय खेळाडूंना आनंद साजरा करण्याची वेळच मिळाली नाही. पुढच्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर जेरेमी हेवर्ड याने गोल करीत बरोबरी साधून दिली.
भारताच्या आक्रमक फळीने वारंवार हल्ले करीत आघाडी घेण्याचे प्रयत्न केले, तथापि आक्रमक फळीतील आकाशदीप आणि गुरजंत यांच्या चुका महागड्या ठरल्या. एस. व्ही. सुनीलने दिलेल्या पासवर चेंडू गोलजाळेत ढकलण्यात गुरजतला अपयश आले. सामना संपायला काही मिनिटे असताना भारताला मिळालेला पेनल्टी कॉर्नर व्यर्थ जाताच चाहत्यांची घोर निराशा झाली. भारताला आज शनिवारी इंग्लंडविरुद्ध सामना खेळायचा आहे.