NA मिळण्यातील हेलपाटे संपवणार; महसूलमंत्री थोरात यांचा मोठा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 10:27 AM2021-12-10T10:27:26+5:302021-12-10T10:27:43+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोरोना काळातील काम, आदित्य ठाकरे यांचे पर्यावरण व पर्यटन मंत्रालयातील कार्य व एकनाथ शिंदे यांनी लागू केलेला कॉमन डीसीआर या निर्णयांचे थोरात यांनी कौतुक केले.
मुंबई : जमीन अकृषक (एनए) करण्यासाठीचा दाखला मिळवताना यापुढे नागरीकांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत, अशी सुलभ पद्धत लवकरच आणणार असल्याची घोषणा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. लोकमत इन्फ्रा कॉन्क्लेव्ह २०२१ मध्ये ‘महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप’ या विषयावर ते बोलत होते.
वर्ग-२च्या जमिनी अकृषक करण्यास संबंधित प्राधिकाऱ्याकडे अर्ज करा, चालान भरा आणि एनए मिळवा इतकी सोपी पद्धत असेल.
शेतकऱ्याकडे शेती किती? त्यावर पीक कोणते? त्याची स्थिती काय? अशी सगळी माहिती मोबाइलद्वाहे लाखो शेतकरी आज रोजच्या रोज अपलोड करत आहेत. त्या माध्यमातून राज्यात कोणते पीक मुबलक येत आहे व कोणत्या पिकाचा तुटवडा भासणार आहे, याचा नेमका अंदाज सरकारला लवकरच बांधता येईल. यामुळे कृषी उत्पादनांच्या आयात-निर्यातीबाबत धोरण ठरवणे सोपे होणार आहे, असे थोरात यांनी सांगितले.
थोरात म्हणाले की, इन्फ्रा परिषदेत महसूलमंत्र्यांचे काय काम, असा प्रश्न काहींच्या मनात असेल; परंतु विजय दर्डा यांना माहीत आहे की, महसूल खात्याखेरीज विकास होत नाही. थोरात यांच्या या विधानावर सभागृहात हशा पिकला. तुम्ही उभा राहिलेला पूल पाहिला; पण पुलाखालची जमीन पाहिली नाही. जमिनीचा सातबारा, प्रॉपर्टी कार्ड पाहिले नाही. आम्हाला (महसूल) वजा केले, तर काहीच नाही. ज्या जमिनीवर इन्फ्रास्ट्रक्चर उभे आहे ती आमचीच आहे. थोरात यांच्या या विधानाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली.
रेडीरेकनरचे दर हे यापूर्वी वाढत होते. आता जेथे दर कमी झाले तेथील रेडीरेकनर दर सरकारने कमी केले, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जमीन मोजणीची पद्धत सोपी व्हावी याकरिता रोअर यंत्राचा वापर केला जाणार असून, त्यामुळे जमीन मोजणी एका तासात पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लिव्ह लायसन्स, मॉर्गेज रजिस्ट्रेशन यासारख्या कामांकरिता रजिस्ट्रेशन कार्यालयात खेटे घालावे लागणार नाहीत, अशी व्यवस्था निर्माण करीत आहोत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोरोना काळातील काम, आदित्य ठाकरे यांचे पर्यावरण व पर्यटन मंत्रालयातील कार्य व एकनाथ शिंदे यांनी लागू केलेला कॉमन डीसीआर या निर्णयांचे थोरात यांनी कौतुक केले. कमी काळात उभ्या राहिलेल्या समृद्धी महामार्गाचे डॉक्युमेंटेशन करण्याची सूचना त्यांनी केली.
ऑनलाइन सातबाराचा उतारा देताना अनावश्यक बाबी काढून टाकल्या व त्याचे मोफत वाटप केले. फेरफार ऑनलाइन मिळत असल्याने लोकांचे हेलपाटे वाचले आहेत. १ ऑगस्टपासून एक कोटी २५ लाख खाते उतारे लोकांनी डाऊनलोड केले आहेत. - बाळासाहेब थोरात