Lokmat Infra Conclave: समृद्धी महामार्गाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, दोन महिन्यांत खुला होणार मोठा टप्पा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 12:24 PM2021-12-08T12:24:12+5:302021-12-08T12:24:41+5:30
केवळ नागपूरपर्यंत समृद्धी महामार्ग थांबवायचा नाही, गडचिरोलीपर्यंत पोहोचवायचाय : एकनाथ शिंदे
"सध्या आपण अनेक महत्त्वाचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प करत आहोत. आपण २०२५ मध्ये महाराष्ट्र कसा असेल यापेक्षा आपण पुढील २० ते २५ वर्षांमध्ये महाराष्ट्र कसा असेल याचं व्हिजन ठेवलं पाहिजे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा महत्त्वाचा महामार्ग आहे. ७०० किलोमीटरच्या या महामार्गांतील शिर्डी नागपूर हा महामार्ग पुढील दोन महिन्यांत सुरू होण्याची शक्यता आहे. या महामार्गावर आम्ही ग्रीन बेल्टही तयार केला आहे. तसंच महामार्ग केवळ नागपूरपर्यंत न ठेवता गोंदीया, भंडारा, गडचिरोलीपर्यंत पोहोचवायचा आहे. नक्षलग्रस्त जिल्हा ही ओळख पुसून त्या ठिकाणी विकासाची गंगा पोहोचवायची आहे," असं मत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.
लोकमततर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह' 'महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप' या कार्यक्रमात एकनाथ शिंदे बोलत होते. बुधवारी मुंबईत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यक्रमाला उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. "सध्या महाराष्ट्रात अनेक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट सुरू आहेत. २०२५ मध्ये महाराष्ट्रात कसा असेल हे व्हिजन ठेवण्यापेक्षा पुढील २०-२५ वर्षांत महाराष्ट्र कसा असेल असं व्हिजन ठेवलं पाहिजे. ब्रिटिश गेले पण त्यांनी उभारलेल्या वास्तू आजही तशाच आहेत. त्यामुळे त्यांचं तेव्हाचं व्हिजन काय अशा अनेक गोष्टी आत्मसात करू शकतो," असंही शिंदे म्हणाले.
"मुंबई एमएमआर महत्त्वाचा भाग आहे. शहरीकरण वाढलंय, गरजा वाढल्यात, रस्ते, कोस्टल रोड, वांद्रे वर्सोवा सिलिंक, मुंबई शिवडी ट्रान्सहार्बर असे अनेक प्रकल्प सुरू आहेत. मुंबई, नवी मुंबई, रायगड हे तीन जिल्हे आपण जोडतोय. समृद्धी महामार्ग ७०० किमीचा रस्ता. पुढील दोन महिन्यांमध्ये शिडी नागपूर महामार्ग सुरू होण्याची शक्यता आहे. महामार्गांवर ग्रीन बेल्ट तयार केला आहे. तसंच पर्यावरणाची आम्ही काळजी घेतली आहे. वन्यजीवांचीही काळजी घेतली आहे. वन्यजीवांना ये-जा करण्यासाठी अंडरपास केला आहे," असंही त्यांनी नमूद केलं.
स्टँप ड्युटी कमी करण्याच्या निर्णयाचा फायदा
एमएमआरडीए मोठं काम करतंय. येत्या काळात मेट्रोचं जाळंही बदलापूर्यंत नेण्याचे विचार सुरू आहेत. आज सिडको आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारतंय. राज्यात अनेक पायाभूत सुविधांची कामं सुरू आहेत. भविष्यात याचा सर्वांना फायदा होईल. ज्या देशाचे जिल्ह्याचे रस्ते चांगले त्यांची प्रगती अधिक होते. सर्व विभाग मोठी काम करतायत. घरं बांधतायत हे सर्व आपण विकासासाठी करत आहोत. महसूल विभागही आम्हाला तितकं महत्त्वाचं आहे. लोकांना स्टँप ड्युटी आणि रजिस्ट्रेशनमध्ये सवलत दिली पाहिजे असं वाटतं. कोरोना काळात दिलेल्या सवलतीमुळे मोठं नुकसान होईल, असं लोकांना वाटलं होतं. परंतु तसं काही झालं नाही. रिअल इस्टेट महत्त्वाचा विभाग आहे. रिअल इस्टेटला आम्ही ऑक्सिजनही दिला आणि बुस्टर डोसही दिला. शेतीनंतर या क्षेत्रात लाखो लोक काम करतायत. सर्वसामान्य लोकांनाही या निर्णयाचा खुप फायदा झाला असल्याचंही शिंदे म्हणाले.