Lokmat Infra Conclave: शिवसेनेच्या मंत्र्यांसमोर थोरात म्हणाले, आम्हाला वजा केलं तर काहीच नाही; अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 01:15 PM2021-12-08T13:15:52+5:302021-12-08T13:20:53+5:30

Lokmat Infra Conclave: लोकमतच्या इन्फ्रा कॉन्क्लेव्हमध्ये बाळासाहेब थोरातांनी मांडलं इन्फ्रा व्हिजन

Lokmat Infra Conclave nothing is possible without us says congress leader balasaheb thorat | Lokmat Infra Conclave: शिवसेनेच्या मंत्र्यांसमोर थोरात म्हणाले, आम्हाला वजा केलं तर काहीच नाही; अन् मग...

Lokmat Infra Conclave: शिवसेनेच्या मंत्र्यांसमोर थोरात म्हणाले, आम्हाला वजा केलं तर काहीच नाही; अन् मग...

Next

मुंबई: गेली दोन वर्षे सगळ्यांसाठीच आव्हानात्मक होती. कोरोना संकटात संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती. लोकांचा जीव वाचवणं महत्त्वाचं होतं. पण त्यासोबतच राज्याचा विकास सुरू ठेवणंदेखील गरजेचं होतं. महाविकास आघाडी सरकारनं दोन्ही आघाड्यांवर उत्तम काम केलं, असं मत महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं. ते 'लोकमत इन्फ्रा कॉन्क्लेव्ह'मध्ये बोलत होते.

बाळासाहेब थोरात यांच्याआधी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी राज्यात सुरू असलेली विकासकामं, रस्ते बांधणी, उद्योग याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यानंतर बोलताना थोरात यांनी महसूल विभागाचं महत्त्व सांगितलं. विविध विकासकामांमध्ये, उद्योगांमध्ये महसूल विभागाचं काम किती मोलाचं असतं ते थोरात यांनी थोडक्यात सांगितलं.

'तुम्ही पूल पाहिला. पण त्याखाली असलेली जमीन पाहिलीच नाही. तुम्ही विकास कामांसाठी आवश्यक असलेलं भूसंपादन पाहिलं नाही. तुम्ही सात बारा, प्रॉपर्टी कार्ड, स्टॅम्प ड्युटी, रेडी रेकनर पाहिला नाही. गौण खनिजाचा विषय लक्षात घेतला नाही. अरे आम्हाला वजा केलं तर काहीच नाही,' असं थोरात यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. कोणताही उद्योग, विकास प्रकल्प सुरू करण्यासाठी सर्वात महत्त्वाची असते जमीन. कारण तिथूनच तर उद्योग आणि प्रकल्पांची सुरुवात होते, असं थोरात म्हणाले.

विकासाला चालना देण्यासाठी लवकरच एनएबद्दल मोठा निर्णय घेणार असल्याचं थोरात यांनी सांगितलं. २०१४ च्या आधी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार असताना आम्ही एनएमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला. कारण कोणताही उद्योग सुरू करताना सर्वाधिक त्रास एनएमुळे होतो. पण आता एनए सहजसोपा करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आता जिथे एनए असेल, त्याची माहिती महसूल विभागच तुम्हाला देईल. त्यासाठी सनदेचा मसुदा फायनल करायचा आहे. यामुळे एनएची सनद मिळणं सोपं होईल, असं थोरात यांनी सांगितलं.

Web Title: Lokmat Infra Conclave nothing is possible without us says congress leader balasaheb thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.