Lokmat infra Conclave:...त्यानंतर घरांच्या किमती कमी होतील; मुंबईत मोठ्या प्रमाणात घरं उपलब्ध होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 10:34 AM2021-12-10T10:34:55+5:302021-12-10T10:36:26+5:30
म्हाडावरील नागरिकांच्या विश्वासामुळे प्रत्येक सोडतीला चांगला प्रतिसाद मिळतो. एका घरासाठी दोनशे ते अडीचशे अर्ज असतात. ही एका अर्थाने अभिमानाची बाब असली तरी त्याचवेळी थोडी खेदाचीही बाब आहे की प्रत्येक घरामागे अडीचशे लोक ताटकळत असतात.
मुंबई : बीडीडी चाळी आणि मोतीलाल नगरच्या पुनर्वसनातून मुंबईत मोठ्या प्रमाणावर घरे उपलब्ध होणार आहेत. घरांचा पुरवठा वाढला की किमती कमी होण्यास मदत होणार असल्याचे गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांनी सांगितले.
‘सगळ्यांना घर आणि सगळ्यांसाठी घर’ या विषयावर सादरीकरण केले. म्हैसकर म्हणाले, गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून ८० वर्षे जुने असलेल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. एकूण ३५ हजार कोटींच्या या प्रकल्पातून २३ हजार घरे तयार केली जाणार आहेत. त्यात पुनर्वसनासाठीच्या १५ हजार घरांव्यतिरिक्त नवी आठ हजार घरे निर्माण होणार आहेत. तर, गोरेगावच्या मोतीलाल नगरच्या पुनर्विकास प्रकल्पात २५ हजार घरे स्थानिकांना मिळणार आहेत. ४२ एकरावरच्या या वसाहतीच्या पुनर्विकासानंतर २५ हजार लोकांचे पुनर्वसन केले जाणार आहे. तर, साधारण बारा-साडेबारा हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचे गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांनी सांगितले.
म्हाडावरील नागरिकांच्या विश्वासामुळे प्रत्येक सोडतीला चांगला प्रतिसाद मिळतो. एका घरासाठी दोनशे ते अडीचशे अर्ज असतात. ही एका अर्थाने अभिमानाची बाब असली तरी त्याचवेळी थोडी खेदाचीही बाब आहे की प्रत्येक घरामागे अडीचशे लोक ताटकळत असतात. ही दरी भरून काढण्यासाठी म्हाडा व एसआरएच्या माध्यमातून काम होत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील वीस लाख मंजूर घरे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत, असे म्हैसकर यांनी सांगितले.
पुरवठा वाढला की किंमती कमी होतात, हा साधा बाजारपेठीय नियम आहे. त्यामुळे घरांचा पुरवठा, उपलब्धता वाढली की किमती कमी होतील. गृहनिर्माण विभागाच्या विविध प्रयत्नांतून पुढील काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर घरे उपलब्ध होतील. - मिलिंद म्हैसकर प्रधान सचिव, गृहनिर्माण