लोकमतची ‘इन्फ्रा कॉनक्लेव्ह - २०२१’ मुंबईत; महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप आज उलगडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 08:55 AM2021-12-08T08:55:40+5:302021-12-08T12:25:48+5:30
Lokmat Infra Conclave-2021: उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे मान्यवर राज्याच्या विकासरथाची दिशा उलगडणार आहेत.
मुंबई : समृद्धीच्या महामार्गावर निघालेला महाराष्ट्र २०२५मध्ये विकासाच्या नकाशावर कुठे असेल, त्यातील टप्पे कसे असतील, हे स्पष्ट करणारी, राज्यस्तरीय पायाभूत सुविधांचा वेध घेणारी ‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह-२०२१’ आज, बुधवारी मुंबईत हॉटेल ट्रायडंट येथे होत आहे. Lokmat Infra Conclave-2021 या राज्यस्तरीय परिषदेत विविध विभागांचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी राज्याच्या विकासाचा रोडमॅप उलगडणार आहेत.
या परिषदेत, नागरी भागातील पायाभूत सुविधा, औद्योगिक सुविधा, त्यांचे अर्थकारण, गृहनिर्माणातील आव्हाने आणि संधी यांच्याशी निगडित विषयांवर विचारमंथन होणार आहे.
उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे मान्यवर राज्याच्या विकासरथाची दिशा उलगडणार आहेत. त्यांच्यासोबत, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आय. एस. चहल, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, एमएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्त सोनिया सेठी, सिडकोचे एमडी संजय
मुखर्जी, एमएसआरडीसीचे एमडी राधेश्याम मोपलवार, एमआयडीसीचे सीईओ पी. अनबलगन, ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा, कल्याण-डोंबिवलीचे महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, नागपूरचे महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., साईबाबा संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायत हे वरिष्ठ अधिकारी त्यांच्या विकास नकाशाची मांडणी करणार आहेत. या परिषदेच्या आयोजनात जे. कुमार, एनसीसी, एमआयडीसी, एसएमई चेंबर ऑफ इंडिया, न्यूज १८ लोकमत यांचे सहकार्य लाभले आहे. या परिषदेस प्रवेश केवळ निमंत्रितांसाठी आहे.
आदित्य ठाकरे यांची विशेष मुलाखत
‘कसा असेल महाराष्ट्र - २०२५' या विषयावर पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची विशेष मुलाखत लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक ऋषी दर्डा घेणार आहेत.