२३ व्या वर्षी आदिवासी समाजाची लेक बनली न्यायाधीश; प्रसुतीनंतर दिली होती परीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 01:04 PM2024-02-14T13:04:28+5:302024-02-14T13:04:58+5:30
एवढ्या कमी वयात एका दुर्गम डोंगराळ भागातील आदिवासी मुलीने हे यश संपादन केल्याचे पाहून मला आनंद झाला असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
चेन्नई - वयाच्या २३ वर्षीय आदिवासी समाजातील मुलगी व्ही श्रीपतीने तामिळनाडू लोकसेवा आयोग (TNPSC) द्वारे आयोजित दिवाणी न्यायालय न्यायाधीश परीक्षेत उत्तीर्ण होऊन इतिहास रचला आहे. व्ही श्रीपती थिरुपथूर जिल्ह्यातील पुलियुर गावातील बहुसंख्य मल्याळी लोकसंख्येतील येलागिरी हिल्सची आहे. तिरुवन्नमलाई येथील राखीव जंगलाच्या सीमेवर असलेल्या थुविंजीकुप्पम येथे ती वास्तव्यास होती.ती कालियाप्पन आणि मल्लीगा यांची मोठी मुलगी आहे.
व्ही श्रीपतीच्या या कामगिरीकडे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यासह अनेकांचे लक्ष लागले आहे. ती केवळ राज्याच्या सर्वात मागासलेल्या डोंगराळ भागातून आली म्हणूनच नाही तर परीक्षेच्या काही दिवसांपूर्वीच तिने एका बाळाला जन्म दिला होता. सीएम एमके स्टॅलिन यांनी श्रीपतीच्या कामगिरीचे कौतुक केले.
'X' या सोशल मीडिया अकाउंटवर मुख्यमंत्र्यांनी लिहिले की, एवढ्या कमी वयात एका दुर्गम डोंगराळ भागातील आदिवासी मुलीने हे यश संपादन केल्याचे पाहून मला आनंद झाला. आमच्या द्रविड मॉडेल सरकारने तामिळ भाषेत शिक्षित लोकांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य म्हणून आणलेल्या योजनेतून श्रीपती यांची न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे हे जाणून मला अभिमान वाटतो. तिच्या यशाला पाठिंबा दिल्याबद्दल तिच्या आई आणि पतीचे आभार! श्रीपतीसारख्या मुलीची कामगिरी पाहून जे सामाजिक न्याय हा शब्द उच्चारण्याचे धाडस न करत नाहीत त्यांच्यासाठी तामिळनाडूचं हे उत्तर आहे असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.
திருவண்ணாமலை மாவட்டம் ஜவ்வாதுமலையை அடுத்த புலியூர் கிராமத்தைச் சேர்ந்த திருமதி ஸ்ரீபதி அவர்கள் 23 வயதில் உரிமையியல் நீதிபதி தேர்வில் வெற்றி பெற்றுள்ளார்!
— M.K.Stalin (@mkstalin) February 13, 2024
பெரிய வசதிகள் இல்லாத மலைக்கிராமத்தைச் சேர்ந்த பழங்குடியினப் பெண் ஒருவர் இளம் வயதில் இந்நிலையை எட்டியிருப்பதைக் கண்டு… pic.twitter.com/Mpd30PBBeZ
दरम्यान, श्रीपती यांच्या न्यायाधीशपदी निवडीनंतर गावात जल्लोषाचं वातावरण आहे. आतापर्यंत गावातील कुणीही इतक्या मोठ्या पदावर गेले नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी ढोल ताशे, पुष्पवृष्टी करत एका भव्य रॅली काढत तिचे स्वागत केले. श्रीपतीनं बॅचरल ऑफ लॉ मधून तिचे संपूर्ण शिक्षण पूर्ण केले आहे.