परिस्थितीशी दोन हात! ऑटो रिक्षा चालकाची बहीण झाली उपजिल्हाधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 08:02 AM2023-01-17T08:02:51+5:302023-01-17T08:03:03+5:30
वसीमा असे या तरुणीचे नाव आहे. तिचे वडील महबूब शेख हे मानसिक आजाराने ग्रस्त आहेत.
गोविंद कदम
लोहा (जि. नांदेड) : लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमुळे ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी कुटुंबातील काही मेहनती तरुण-तरुणींनी परिस्थितीशी दोन हात करत मोठ्या पदापर्यंत मजल मारली आहे. तालुक्यातील जोशीसांगवी येथील एका रिक्षा चालकाच्या बहिणीने असेच यश संपादन करून सध्या अमरावती येथे उपजिल्हाधिकारी म्हणून ती रुजू आहे.
वसीमा असे या तरुणीचे नाव आहे. तिचे वडील महबूब शेख हे मानसिक आजाराने ग्रस्त आहेत. अशाही स्थितीत वसीमाने सेल्फ स्टडी करून स्वतःला सिद्ध केले. वसीमाने डीएड उत्तीर्ण केले. नंतर मुक्त विद्यापीठातून बीएची पदवी घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी केली.
कष्टाचे चीज
वसीमाच्या आईने मोलमजुरी करून, तर भावाने ऑटो रिक्षा चालवून तिच्या शिक्षणासाठी मोलाची मदत केली. नागपूर येथे विक्रीकर निरीक्षकपदी कार्यरत असताना उपजिल्हाधिकारीपदाचे स्वप्न तिला स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळेच नोकरी सांभाळत तिने अभ्यास सुरूच ठेवला.