उधारीवर पुस्तके, यु-ट्यूबवरून अभ्यास; गरीब आदिवासी शेतकऱ्याचा मुलगा होणार डॉक्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 08:11 AM2024-09-10T08:11:48+5:302024-09-10T08:12:28+5:30

१९ वर्षीय आदिवासी विद्यार्थ्याला पहिल्याच प्रयत्नात नीटमध्ये यश, सनातनचे वडील कनेश्वर प्रधान हे दुर्गम तडीमाहा गावात छोटे शेतकरी आहेत.

Books on loan, studies from YouTube; The son of a poor tribal farmer will become a doctor | उधारीवर पुस्तके, यु-ट्यूबवरून अभ्यास; गरीब आदिवासी शेतकऱ्याचा मुलगा होणार डॉक्टर

उधारीवर पुस्तके, यु-ट्यूबवरून अभ्यास; गरीब आदिवासी शेतकऱ्याचा मुलगा होणार डॉक्टर

ब्रह्मपूर - ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्याच्या एका दुर्गम गावातील १९ वर्षीय आदिवासी विद्यार्थ्याने पुस्तके उधार घेत आणि इंटरनेटचा वापर करण्यासाठी दररोज आपल्या गावापासून तीन किलोमीटर दूर असलेल्या टेकडीवर जात अभ्यास केला. त्याच्या या प्रयत्नांना यश आले असून, तो वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट’ पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला आहे. डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सनातन प्रधानच्या जिद्द, कठोर परिश्रम आणि अथक प्रयत्नांच्या प्रवासामुळे त्यांच्या कुटुंबाला अभिमान तर आहेच पण संधीची शक्यता कमी असतानाही त्याच्या आयुष्यात आशेचा एक नवा किरण उगवला आहे. 

सनातनचे वडील कनेश्वर प्रधान हे दुर्गम तडीमाहा गावात छोटे शेतकरी आहेत. कांधा जमातीशी संबंधित असलेल्या सनातनने कोणताही क्लास न लावता पहिल्याच प्रयत्नात नीट परीक्षा उत्तीर्ण केली असून, तो आता येथील सरकारी एमकेसीजी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची तयारी करत आहे. मात्र त्याला आर्थिक मदतीची सध्या गरज आहे. 

गावात इंटरनेट नाही
दरिंगबाडीच्या शासकीय शाळेतून दहावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सनातनने १२वीच्या अभ्यासासाठी ब्रह्मपूर येथील खलिकोट कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला. १२वी पूर्ण केल्यानंतर तो नीटच्या तयारीसाठी आपल्या गावी परतला. त्याच्या गावात इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्यामुळे, इंटरनेट वापरण्यासाठी आणि परीक्षेची तयारी करण्यासाठी तो दररोज तीन ते चार किलोमीटरचा प्रवास करून डोंगराळ भागात जात असे.  

असा केला अभ्यास
सनातन म्हणाला की, दररोज डोंगरावर अभ्यास करणे अवघड होते. परीक्षेच्या दोन महिने आधी परीक्षेठी ब्रह्मपूरला परतलो. ऑनलाइन आणि मित्रांकडून काही पुस्तके उधार घेऊन परीक्षेची तयारी केली. वैद्यकीय कॉलेजात जागा मिळण्याची मला खात्री होती, मात्र, एमकेसीजी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणे हे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे.

मी प्रामाणिकपणे अभ्यास करेन आणि जिथे वैद्यकीय सुविधा कमी आहेत, तिथे डॉक्टर बनून दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांची सेवा करेन. -सनातन प्रधान

Web Title: Books on loan, studies from YouTube; The son of a poor tribal farmer will become a doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.